पावसाळ्यात नेमक्या नैसर्गिक आपत्तीबाबत काय अडचणी येतील, नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर तातडीने काय उपाययोजना करावयाच्या याबाबतचा आढावा घेतला जात आहे. नेमकेपणाने काय करायला हवं याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. येत्या पावसाळ्यात आपद्ग्रस्तांची गैरसोय होणार नाही याबाबतची काळजी सरकार आणि प्रशासन घेत आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे दिली. सामंत म्हणाले, लोटे येथेही आपण आढावा बैठक घेत आहोत. या बैठकीत कंपन्यांमध्ये होणारे स्फोट, परशुराम घाट याबाबतचाही आढावा घेतला जाईल. महामार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यासंदर्भात महामार्ग विभागाला योग्य त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह सुस्थितीत व्हावे यासाठी जिल्हा नियोजनमधून ७५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. चिपळूण शहरातील नालेसफाईतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी करण्याचेही निर्देश दिले असून, दुर्दैवी घटना घडल्यास स्थलांतराबाबत काय करता येईल अशी कोणती ठिकाणी आहेत याबाबतचाही एक तक्ता तयार केला आहे. पाग येथे पाणी साचण्याच्या ठिकाणी मातीचा भराव टाकला जात आहे. ब्ल्यू आणि रेडलाईनबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असून, वाशिष्ठी नदीतील बेटे काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी आवश्यक आहे. त्या संदर्भात मंत्री नीतेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे. चिपळूण बसस्थानकाचे काम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली. वाशिष्ठीतील एक लाख ८२ हजार क्युबिक मीटर गाळ काढला गेला आहे. शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहे. तांदूळ, नाचणी असे ९२ क्विंटल बियाणे चिपळूणसाठी उपलब्ध झाले आहे.
२१ शेल्टर हाउस – दुर्गम भागात व कोकण किनारपट्टीवर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास २४८ कोटी रुपये खर्चुन २१ शेल्टर हाउस बांधली गेली आहेत. स्थलांतरासाठी याचा उपयोग होईल त्यानंतर सभागृह म्हणून त्याचा वापर केला जाईल.
विनोद झगडे आमच्या रांगेत – विनोद झगडे यांनी उबाठा शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला, त्यांची नाराजी नेमकी काय आहे हे मी अजून जाणून घेतलेले नाही. आजच्या दौऱ्यात त्यांच्याशी चर्चा होईल. ते आज आमच्या रांगेत बसले आहेत; मात्र आमच्यामध्ये रोहन बने आहेत. त्यामुळे कानामध्ये कसलीही चर्चा झालेली नाही. पुढील काही तासांत त्यांच्याशी चर्चा होईल. त्यांच्यासारखा प्रशासनावर पकड असणारा सक्षम लोकप्रतिनिधी आमच्या शिवसेनेत असणे गरजेचे आहे.