महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी म ीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. १ जुलैपासून सुरु झाला आहे. या अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. स्मार्ट टीओडी मीटरमुळे जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ हजार ४८१ ग्राहकांना ३ लाख २० हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार १२५ ग्राहकांना ६७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.
ऑगस्ट महिन्यात वीज ग्राहकांची मिळालेली सवलत वाढली असून रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ हजार ३५९ ग्राहकांना ११ लाख ८१ हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ हजार ७७२ ग्राहकांना ०३ लाख ९७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीज वापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकानंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे.

