नागरिकांच्या सोईसाठी पालिकेने शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था केली आहे; परंतु या शौचालयांच्या इमारतींचा गैरवापर होताना दिसत आहे. मुळात सर्वाजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. त्यात इमारतींवरही काही महाभागांनी बिनदिक्कत टीव्हीच्या डिश बसवून गैरवापर करत असल्याचे दिसत आहे; परंतु पालिकेने याकडे डोळेझाक केल्यामुळे महाभागांचे हे फावले आहे. रत्नागिरी पालिकेतर्फे सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालय उभारण्यात आली आहे; मात्र ही सार्वजनिक स्वच्छतागृह किती स्वच्छ असतात, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे.
अशा परिस्थितीतच शहरातील काही महाभाग वैयक्तीक फायद्यासाठी या इमारतींचा कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे ते मांडवी येथील एका सार्वजनिक शौचालयात. मांडवी परिसरातील झोपडपट्टी भागामध्ये हा अजबगजब प्रकार पाहायला मिळाला आहे. काही महाभागांनी या सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीवर एक नव्हे तर दोन डिश टीव्हीच्या डिश बसवण्यात आल्या आहेत. अनेक महिन्यांपूर्वीपासूनच्या या डिश आहेत; परंतु पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.
या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता पालिका करते. पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करत असतील तर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला नाही का? की, पालिकेच कर्मचारी स्वच्छतेसाठी फिरकतच नाहीत, असा हा गंभीर विषय पुढे आला आहे; परंतु याबाबत पालिका अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून पालिका सार्वजनिक स्वच्छतेसाठी किती तत्पर आहे, हे लक्षात येते.