येथील काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेसच्या या रिक्त झालेल्या पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा असतानाच अचानक खेर्डीतील कॉंग्रेसचे जुने पदाधिकारी सुधीर दाभोळकर यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्षांमार्फत करण्यात आली, मात्र त्यांच्या या निवडीला पक्षांतर्गत विरोध जोरदार होऊ लागला आहे. काहींनी पक्षाचा राजीनामा देण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २) बैठकीचे आयोजन केले आहे. तालुक्यात काँग्रेसने प्रशांत यादव यांच्या माध्यमातून चांगली पकड घेतली होती.
यादवांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने, मोर्चे, निदर्शने व अन्य उपक्रम राबवले होते. चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. विद्यमान आमदार अजित पवार गटातर्फे सक्रीय असल्याने शरद पवार गटातून संधी असल्याने यादव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना चिपळूण मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली. त्यानंतर यादव यांच्या रिक्त झालेल्या चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सुधीर दाभोळकर यांची निवड झाली, मात्र ही निवड पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर झाली आहे. त्यांच्या या निवडीला स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दाद मागण्यात आली आहे. दाभोळकर हे काँग्रेसचे जुने पदाधिकारी असले, तरी ते २० वर्षे पक्षात कुठेही सक्रिय नव्हते किंवा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात तसेच कुठल्याही आंदोलनात सहभाग नव्हता. त्यामुळे त्यांच्या या निवडीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांची निवड करताना किमान पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला होते. परंतु परस्पर निवड केल्याने काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांसह सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
अनेकांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे संपर्क साधून तालुकाध्यक्ष निवडीत तत्काळ फेरबदल करण्यात मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, महिला काँग्रेस शहराध्यक्ष श्रद्धा कदम व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी दिली.