महावितरण कंपनीच्या खेड, दापोली व मंडणगड विभागातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा व शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील वीज ग्राहकांकडे थकलेल्या वीजबिलापोटीची रक्कम मार्च अखेरमध्ये वसूल करण्यासाठी ४७६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या ग्राहकांकडे २६ लाख ३५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी आहे. महावितरणच्या विभागीय कार्यक्षेत्रात दापोली नं. १, दापोली नं. २, खेड, लोटे, मंडणगड विभाग येत असून फेब्रुवारी अखेर २१ हजार २४३ वीज ग्राहकांची ५ कोटी ४२ लाख इतकी रक्कम थकबाकी होती. महावितरणच्या वसुली पथकाने १ ते ३० मार्च या कालावधीत राबवलेल्या वसुली मोहिमेत खेड उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३५ ग्राहकांकडे ८६ हजार ३०० रुपये थकल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. लोटे उपविभागातील १४० ग्राहकांकडे ६ लाख १० हजार ८ रुपये थकल्याने त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला.
दापोली नं. १ उपविभागीतील १२५ ग्राहकांकडे ४ लाख ५८ हजार २५० रुपयांची तर दापोली नं. २ मध्ये ६६ ग्राहकांकडे २ लाख २९ हजार ९०३ रुपयांची तसेच मंडणगड उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ११० ग्राहकांकडे १२ लाख ५१ हजार ११४ रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. गतवर्षी मार्चअखेरचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यात खेड़, मंडणगड व दापोली तालुक्यातील ६९५ ग्राहकांचा वीजपुरवठा वसुली पथकांकडून तोडण्यात आला होता. त्यांच्याकडे १६ लाख २० हजार २७८. रुपयांची थकबाकी राहिली होती. यावर्षी- महावितरणने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. महावितरणने नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी थकबाकीदार असलेल्या ३ तालुक्यातील ग्राहकांवर कारवाई केल्याने सारे सजग झाले आहेत.
थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र – महावितरणच्या विभागीय कार्यक्षेत्रात दापोली नं. १, दापोली नं. २, खेड, लोटे, मंडणगड विभाग येत असून महावितरणच्या वसुली पथकाने १ ते ३० मार्च या कालावधीत राबवलेल्या वसुली मोहिमेत खेड उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३५, लोटे उपविभागातील १४०, दापोली नं. १ उपविभागीतील १२५, दापोली नं. २ मध्ये ६६ तसेच मंडणगड उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ११० ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे.