शिवसेनेचे आजचे हे शक्तिप्रदर्शन नाही, तर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. किरण ऊर्फ भय्या सामंत यांना खासदारकीची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. मी तर त्यांचा धाकटा भाऊ आहे, माझी भावना वेगळी नाही. त्यामुळे येथील राजकीय वातावरण आणि आमच्या भावना मी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. हॉटेल विवेकच्या मैदानात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीचे रुपांतर मोठ्या मेळाव्यात झाले. सामंतप्रेमी हजारोच्या संख्येने जमा झाले होते.
उदय सामंत म्हणाले, “विरोधी पक्षाच्या एका आमदाराने आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. घरापर्यंत पोहोचू नका, तुमच्यापेक्षा वाईट मी बोलू शकतो. स्वतःचा मतदारसंघ सांभाळा. तुमच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. माझा संयम माझी मजबुरी नाही. बालीश चाळे सोडा. आम्हाला शक्तिप्रदर्शन करायचे असते तर चंपक मैदानात केले असते; परंतु या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.” सामंत म्हणाले, “भाजपने या जागेवर दावा केला, बूथ वॉरिअरची बैठक घेतली. त्याबाबत आकस असण्याचे कारण नाही. आपण पुन्हा चर्चा करून सव्र्व्हे घेऊन निर्णय घ्यावा, असे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगू. कारण एकवेळ मी लोकांच्या संपर्कात कमी पडेन; परंतु भय्यांचा संपर्क माझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणून या जागेसाठी सर्वांच्या भावना आहेत.
महायुतीचा कोणताही उमेदवार असेल तर त्याला निवडून आणू, मात्र आपली भावना मांडली आहे. सेनेची ताकद दाखवली आहे. महायुतीचा आदर ठेवून काम करायचे आहे. कुठेही कटुता येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कारण आपल्याला पाचही आमदार निवडून आणायचे आहेत. आमची ही फक्त भावनिक नाही तर प्रामाणिक मागणी आहे.” प्रचाराचे प्रशिक्षण घ्या रत्नागिरीत पदाधिकाऱ्यांना प्रचाराचे प्रशिक्षण घ्यायला हवे. तशी यंत्रणा मजबूत करा. ८५ वर्षांवरील ३६ हजार मतदार आहेत, तर १७ हजार दिव्यांग आहेत. त्यांना भेटायला सुरू करा. २ लाख मताने जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवा.
नीलेश राणेंना ५० हजारांचे मताधिक्य देऊ, किरण सामंत – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नारायण राणे यांना विश्वासात घेऊन आपण ही जागा मागितली आहे. लोकसभेबाबत विनाकारण आरोप करणाऱ्यांना सांगू इच्छितो की, नीलेश राणे यांना कमीत कमी ५० हजारांच्या मताधिक्याने विधानसभेला निवडून आणू, असे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत सांगितले.
तिकीट मागताना दुसऱ्याची निंदा नको – एखाद्या आमदारावर कार्यकर्त्यांचे किती प्रेम असते, हे पाहण्यासाठी राज्यातील आमदारांना रत्नागिरीत यावे लागेल. आजवर सामंत कुटुंबाने संघर्षच केला आहे; परंतु आज पोषक वातावरण आहे म्हणून उमेदवारी मिळावी. आपण उमेदवारी मागताना दुसऱ्याची निंदा करायची नाही. त्यांचाही मानसन्मान ठेवत आमच्यापण प्रचाराची आज सुरुवात झाली, असे म्हणावे लागले असेही सामंत म्हणाले.