रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसलेले इ. काँग्रेसच्या भटक्या विमुक्त समाज विभागाचे प्रदेश सचिव श्री. परशुराम खेत्री यांना उपोषण सुरु करुन ४ दिवस झाले तरी जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. श्री. परशुराम खेत्री हे इं. काँग्रेसच्या भटक्या वे विमुक्त समाज विभागाचे प्रदेश सचिव असून त्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र. दि. १५ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आमरण उपोषण सुरु – श्री. परशुराम खेत्री हे भटक्या व विमुक्त समाजाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.. भटक्या व विमुक्त समाजाला जात पडताळणीचे दाखले मिळविण्यासाठी खूप यातायात करावी लागते, ते दाखले त्वरेने मिळावेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील व मुंबई गोवा महामार्ग हे रस्ते खड्डेमुक्त व्हावेत हे २ मुद्दे घेऊन त्यांनी स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले. धो धो पाऊस असूनही त्यांनी निर्धाराने उपोषण सुरुच ठेवले आहे.
जनतेत तीव्र संताप – श्री. परशुराम खेत्री यांनी पूर्णपणे अन्न पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती विलक्षण खालावली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष श्री. दिपक राऊत यांनी सांगितले. उपोषणाला ४ दिवस लोटले तरी जिल्हा प्रशासन ‘ढिम्म’ असून भर पावसात आमरण उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ नेत्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल इं. काँग्रेसचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. नुरुद्दीन सय्यद, उ. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. सोनललक्ष्मी घाग, भूतपूर्व आ. सौ. हुस्नबानू खलिफे व प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष श्री. दिपक राऊत यांनी पत्रकाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जिल्हा प्रशासन ‘ढिम्म’ – श्री. परशुराम खेत्री यांची प्रकृती खूप खालावली तरी जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने इं. काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी श्री. परशुराम खेत्री यांच्यासोबत उपोषणाला बसत असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे निर्धार व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन अशा प्रकारे का वागत आहे तेच समजत नाही अशा संतप्त शब्दात याबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. बशीरभाई मुर्तुझा तसेच काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली सावंत आदी अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी श्री. परशुराम खेत्री यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.