जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा येत्या काही काळात तयार केला जाईल. राज्य सरकारच्या माध्यमातून विकासनिधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, तर आपल्या घराप्रमाणे जिल्ह्यातील शहरे, गावे स्वच्छ ठेवण्यावर नागरिकांनी द्यावा. लाभलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटनाला चालना देणे शक्य आहे. पर्यटकांचा ओढा जिल्ह्यात कायम राहावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केले. श्री. जिंदल यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “रत्नागिरी जिल्हा निसर्गसौंदर्यान सजलेला आहे. येथे पर्यटनातून रोजगारनिर्मिती होऊ शकते, यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत.
जिल्ह्यात नवीन उद्योग येऊ घातले आहेत. त्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्याचे नियोजन यापुढील काळात केले जाईल. सर्व शासकीय विभागांना एकत्र करून जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास आराखडा आपण तयार करणार आहोत.” आंबा, मच्छी व्यवसायवाढीबरोबरच कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. कृषीमध्ये नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न राहील. जिल्हाधिकारी कार्यालय जनतेचे आहे. जनतेच्या समस्यांसाठी ते २४ तास खुले आहे. जनतेने आपल्या समस्या आपल्याकडे थेट मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
सर्व विभागांचा महिन्याला आढावा – शासनाच्या विविध योजना राबवताना सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. एक योजना अनेक विभागांच्या सहकार्याने राबवली जाते. यासाठी संबंधित विभागांमध्ये एकसूत्रता गरजेची आहे. यासाठी महिन्यातून एकदा सर्व विभागांचा एकत्रित आढावा घेतला जाणार असल्याचे श्री. जिंदल यांनी सांगितले.