सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून झाल्याचे वृत्त प्रसिध्द होताच केवळ ‘चिपळूणच नव्हे तर अवघा जिल्हा हादरला. अत्यंत अमानुषपणे करण्यात आलेला खून हा नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचे गूढ कायम आहे. एकापेक्षा अधिक आरोपींनी हा खून केला असावा, असा पोलीसांचा अंदाज आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीसांनी ५ पथके तैनात केली आहेत. त्यापैकी एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले असून अन्य ४ पथके मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी वर्षा जोशी यांच्या कॉम्पुटरमधील हार्डडिस्क देखील काढून नेली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी पूर्ण प्लॅन करून ही हत्या केली असल्याचा संशय असून मारेकरी माहीतगार असण्याचीही श्यक्यता आहे. पोलिसांनी मात्र चारही बाजूने वेगवान तपास सुरू केला आहे.
बुधवारी रात्री झाला खून? – चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या धामणवणे खोतवाडी येथे राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी ६३ वर्षीय विधवा महिलेचा निघृणपणे खून करण्यात – आला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. परंतु शवविच्छेदनाच्या अहवालानुसार घटना उघडकीस येण्यापूर्वी सुमारे १० ते १२ तास अगोदर त्या मयत झालेल्या आहेत. म्हणजेच बुधवारी रात्रीच वर्षा जोशी यांचा खून करण्यात आला असल्याचा अंदाज आहे. तसेच त्यांच्या शरीरावर काही मोजकेच कपडे असले तरी कोणताही अतिप्रसंग झालेला नाही आणि त्यांच्या शरीरावर असलेल्या किरकोळ जखमा या प्रतिकार व झटापटीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच श्वास कोंडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचेदेखील शवविच्छेदनातुन स्पष्ट झाले आहे.
मोबाईल फेकून दिला – दरम्यान मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे देखील समोर आले आहे. येथील सीसीटीव्हीचा मुख्य व्हीडीआर गायब आहे. तसेच जोशी यांचा मोबाईल फोन पाण्याच्या बादलीत फेकून दिलेला होता आणि त्यांच्या संगणकाची हार्डडिस्क गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी रेकी करून पूर्ण प्लॅन तयार करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच मारेकरी माहितगार व एकापेक्षा जास्त असावेत,’या निकषापर्यंत पोलीस आले आहेत.
चौकशीनंतर सोडले – दरम्यान गुरूवारी ज्या एका व्यक्तीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याची चौकशी पूर्ण करून त्याला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला तपास आता अन्य मार्गाने सुरू केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक महामुनीम चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली असून एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले आहे, तर अन्य ४ पथके अन्यठिकाणी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असून ताब्यात घेतले आहे. त्या माध्यमातूनदेखील काही संशयित हालचाली हाती लागण्याची शक्यता आहे. परंतु खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. वर्षा जोशी या एकट्याच घरात राहत होत्या. त्यामुळे घरातून कोणते आणि किती सामान चोरीला गेले किंवा कसे, याचा उलगडा होत नसल्याने खून नेमका कोणत्या उद्देशाने झाला हे संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच समजणार आहे.