29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचे वाजले बारा मोंथा वादळाचा तडाखा

जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचे वाजले बारा मोंथा वादळाचा तडाखा

३ कोटी ६० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सतत खवळलेल्या समुद्रासोबत मोंथा वादळाने रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला हादरवून सोडले आहे. समुद्रातील उंच लाटा, वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पावसामुळे मासेमारी व जलपर्यटन उद्योग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. किनाऱ्यावर शेकडो नौका त्या त्या भागातील सुरक्षित ठिकाणी उभ्या असून, समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. या वादळामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले दोन्ही उद्योग कोलमडले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दापोली तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या हर्णे बंदरातील परिस्थिती खूपच कठीण होऊन बसली आहे. किमान ९०० ते १००० यांत्रिकी नौका आंजर्ले, उटंबर, दाभोळजवळच्या खाडीत आश्रयाला उभ्या आहेत. रोजची करोडो रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. गेल्या १२ ते १५ दिवसांमध्ये हर्णे पंचक्रोशीतील नौकांचे दिवसाला किमान एका नौकेचे सर्व खर्च काढून ४० हजार रुपये फायदा अशा ९०० नौकांचे अंदाजे ३ कोटी ६० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

तर एका नौकेवर ८ खलाशी त्यांचा दिवसाला पगार किमान १ हजार रु. असा दिवसाचा ८ हजार फक्त नोकरपगार आणि त्यांचा खाण्या-पिण्याचा खर्च पकडून किमान ७५ लाख रु. खर्च झाला आहे. काहीही मिळकत नसताना एवढा खर्च करताना मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे, तर राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदर हेदेखील रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे बंदर आहे. दरवर्षी सुमारे शंभर कोटी रुपयांची उलाढाल या बंदरामध्ये होते; परंतु गेल्या १० ते १२ दिवसांपासून येथे मासेमारी पूर्णपणे बंद आहे. ७०-७५ पर्ससीननेट, दीडशे ट्रॉलर, शंभर यांत्रिक आणि ५० बिगरयांत्रिक होड्या या ठिकाणी उभ्या आहेत. सततच्या प्रतिकूल हवामानामुळे २५ ते ३० लाख रुपयांचा तोटा झाल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. बंदरातील रोज दिसणारा मासेमारीचा गजबजलेला कोलाहल आता शांत आहे. नौका स्थिर आहेत आणि जाळ्यांवर पावसाचे थेंबच खेळत आहेत.

जलपर्यटनावर आधात – वादळाचा फटका केवळ मासेमारीवर नाही, तर पर्यटन व जलक्रीडा व्यवसायावरदेखील बसला आहे. दापोलीतील हर्णै, मुरुड, आंजर्ले, पाळंदे आणि रत्नागिरी तालुक्यातील गणयतीपुळे तसेच गुहागर येथील सर्व डॉल्फिन सफारी, बोट राइडिंग, पॅरासिलिंग, बनाना राईड, जेट्सकी राईड, सुवर्णदुर्ग दर्शन, घोडागाडी, उंटाची सफर, सॅन्ड बाईक राईड आशा या जलक्रीडा बंदच आहेत. बीचवरील खानपान व्यावसायिकांचे काम ठप्प झाले आहे. अशा स्थितीत कोकणातील पर्यटनावरही पाणी फिरले आहे. या जलपर्यटनातून या पर्यटन हंगामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर व दापोली-मुरुड, लाडघर किनाऱ्यावरच दिवसाला २ ते ३ लाख रुपयांची उलाढाल होते. ती आता शून्यावर आली आहे. मुरुड बीचवर आलेला पर्यटक डॉल्फिन सफर व सुवर्णदुर्ग दर्शन केल्याशिवाय जात नाही. हंगामात त्याकरिता खूपच पर्यटकांची गर्दी असते. मुरुड येथील असणाऱ्या वॉटर स्पोर्टस् ग्रुपच्या जलपर्यटनातून दिवसाला किमान १ लाख रुपयांचा फायदा होतो. किमान सर्व गेमच्या १०० राईड्स होतात. त्यात नोकरपगार, सर्व यंत्रसामग्रीचा डागडुजीचा खर्च त्यातूनच काढावा लागतो. आता हा खर्च कोठून काढायचा, अशी व्यथा मुरुड येथील वॉटर स्पोर्टस् ग्रुपचे सदस्य रदिश ऊर्फ बाबू घाग यांनी सांगितले.

साखळीतील प्रत्येक व्यवसाय ठप्प – मासेमारी बंद झाल्याने वाहतूकदार, बर्फ कारखाने, डिझेल पुरवठादार, जाळे इंजिन दुरुस्ती कामगार, मासेविक्रेते या सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. जाळ्यांच्या दुरुस्तीचा खर्च, कामगारांचे पगार, इंधनखर्च सगळं वाढतंच आहे; पण उत्पन्न काहीच नाही, अशी मच्छीमारांची व्यथा आहे.

जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला फटका – मासेमारी व जलपर्यटन या दोनच क्षेत्रांवर रत्नागिरी जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. ही दोन्ही क्षेत्रे ठप्प झाल्याने स्थानिक रोजगार व व्यापार कोलमडला आहे. जिल्ह्यातील मच्छीमार संघटना व पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वादळ शांत झाल्यानंतरही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान आठवडा ते दहा दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मासेमारी साखळीवर नकारात्मक परिणाम – गेले १२ दिवस नौका समुद्रात न गेल्यामुळे मासेविक्री, निर्यात आणि त्या संबंधित सर्व व्यवहार थंडावले आहेत. मासेमारी व्यवसायावर थेट अवलंबून असलेले सुमारे सव्वालाख (१.२५ लाख) तांडेल (नौकाप्रमुख) आणि खलाशी (मजूर) यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम झाला आहे. मासेमारी बंद असल्याने त्यांची रोजची कमाई थांबली आहे. नौकामालकांना उत्पन्न शून्य असले तरी खलाशी आणि तांडेल यांचा रोजचा खर्च (राहणे, खाणे) तसेच नौकेचा देखभाल खर्च करावा लागत आहे.

किनाऱ्यावर काळजीचं सावट – मासेमारी हंगामात या वेळी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे मच्छीमारांचे पंधरा दिवस फुकट गेले होते. नारळी पौर्णिमा होऊनही अधूनमधून पाऊस राहिला. गणपती, दसरा आदी काळामध्ये काही प्रमाणात मासे मिळाले; परंतु अवकाळीमुळे मच्छीमारांचे यंदाचे हंगामातील जास्त दिवस फुकटच गेले. वादळानंतरचा शांत समुद्र बाहेरून सुंदर दिसत असला तरी किनाऱ्यावरील प्रत्येक कुटुंबाच्या मनात असुरक्षिततेचं वादळ सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपाने उपजीविकेचा पाया हादरला आहे. आता सगळ्यांचीच एकच इच्छा, वादळ शांत होऊ दे आणि मासेमारी पुन्हा सुरू होऊ दे.

मच्छीमारांना मिळणार नुकसानभरपाई – राज्यात विदर्भ, मराठवाडा आदी भागांत मोठी पूरहानी झाली, तसेच अवकाळीचा फटका बसला. त्याचप्रमाणे कोकणालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शासनाने कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेतकरी, बागायतदारांबरोबर मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याचे निश्चित केली आहे. त्याबाबत लवकरच मत्स्यविभागाकडून पंचनामे करून माहिती घेऊन शासनाला दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular