येथे जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत गेले अनेक वर्षे रत्नागिरीत असलेले कार्यकारी अभियंता विभागीय कार्यलय आता लवकरच चिपळूणमध्ये स्थलांतरित होणार आहे. राज्य सरकारकडून तसे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाना या निमित्ताने यश आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड अशा ५ तालुक्यांसाठी चिपळूण पंचायत समिती येथे जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे विभागीय कार्यकारी अभियंता कार्यलय मंजूर करण्यात आले होते. मात्र चिपळूण पंचायत समिती इमारतीत जागा उपलब्ध नसल्याचे कारण देतं हे कार्यालय गेले कित्येकवर्ष रत्नागिरी जिल्हापरिषदेत सुरू ठेवण्यात आले होते.
रत्नागिरीत कार्यालय असल्याने ऊत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यातील लोकांना रत्नागिरी येथे हेलपाटे मारावे लागत होते. ३ लाखांच्या पुढील बिल असेल तर रत्नागिरी येथूनच ते पास होत होते. त्यामुळे ५ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच ठेकेदारांना रत्नागिरीला जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात होता. तसेच मंडणगड, दापोली, ते रत्नागिरी हे अंतर तब्बल ३०० किमी इतके अंतर असल्याने एका दिवसात परत फिरणे देखील शक्य होत नाही. परिणामी रात्रभर रत्नागिरी येथे मुक्काम करण्याची वेळ येत होती. त्यामुळे ते अत्यंत गैरसोयीचे होते.
त्यामुळे ते कार्यालय चिपळूणमध्ये यावे अशी मागणी सातत्याने होत होती. ५ तालुक्यासाठी असलेले हे कार्यालय चिपळूणमध्ये यावे यासाठी गेले कित्येकवर्ष प्रयत्न केले जात होते. चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी यासाठी आंदोलन देखील छेडले होते. नंतर मात्र माजी सभापती शौकत मुकादम यांनी या विषयात लक्ष घातले आणि थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत सदरचे कार्यालय चिपळूणमध्ये यावे अशी मागणी करून त्या कार्यालयासाठी जागा देखील सुचवली होती.
त्यानुसार आता विभागीय कार्यकारी अभियंता बांधकाम कार्यालय आता चिपळूणमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले असून चिपळूण कलंबस्ते येथील पशुसंवर्धनच्या इमारतीत हे कार्यलय सुरू होण्याची श्यक्यता आहे. अशी माहिती माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिली आहे.