दिवाळी सणाची धूम सुरू झाली असून, पहिल्या दिवशी गणपतीपुळे येथील श्रींचे दर्शन घेण्यासाठी परजिल्ह्यांतून आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. भाऊबीज झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पुन्हा पर्यटकांची वाढती उपस्थिती पाहायला मिळणार आहे. सध्या किनारी भागांमध्ये पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी सणानिमित्त मिळालेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची पावले कोकणातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मंदिर परिसर आणि बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी गणपतीपुळे येथील सर्व लहान मोठे पर्यटन व्यवसायिक, एमटीडीसी आणि देवस्थान समिती सज्ज झाली आहे.
शनिवारपासून गणपतीपुळे येथे पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे तेथील निवासी व्यवस्थापकांनी सांगितले. गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मोरया वॉटर स्पोर्टस्’ संस्थेच्या माध्यमातून बनाना राईड, ड्रॅगन राईड, जेट स्की बोट, डिस्को राईड आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच फोटोग्राफी, उंट व घोडा सफर याच्या अनुभवांचाही आनंद पर्यटक घेऊ शकतात. गणपतीपुळे येथे पर्यटक वाढल्याने येथील व्यावसायिकांची दिवाळी गोड होणार, आहे.

