सणांच्या कालावधीमध्ये चाकरमान्यांसाठी त्यांच्या हक्काची आणि परवडणारी अशी लालपरी कायमच उपलब्ध असते. कोरोना आणि बेमुदत संपाचा काळ अतिशय कठीण होता. त्यामध्ये एसटी सह सर्व सामान्य जनतेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा मात्र संप मिटल्यानंतर गणपती आणि दिवाळी मध्ये चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांसाठी देखील विविध सूट आणि सवलती उपलब्ध करून दिल्या होत्या.
कोरोनापासून सुटका मिळाल्याने यंदा दिवाळीच्या हंगामात गावी जाण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे एसटी महामंडळाची चांगलीच चांदी झाली आहे. दिवाळीसाठी २१ ते ३१ ऑक्टोबर या काळात सोडलेल्या दोन हजाराहून अधिक फेऱ्यांमुळे महामंडळाला अकरा दिवसांत ४ कोटी ९५ लाख प्रवाशांद्वारे तब्बल २७५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर संपूर्ण महिन्यात एसटीने ६४२ कोटी रुपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे.
दिवाळी हंगामात दहा दिवसांसाठी एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढलेले असतात तरीही हे जादा उत्पन्न मिळाले असून विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी एसटीने ५६ लाख किमीचा प्रवास करीत एकाच दिवशी ३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीत गावी जाण्यासाठी तसेच ऑक्टोबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे एसटीने यंदा राज्यभरात नियमित बस फेऱ्यांबरोबरच दोन हजारांहून अधिक जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, ८० लाख ज्येष्ठांनी मोफत प्रवासाचा फायदा करून घेतला आहे. त्यामुळे हळूहळू का होईना पण एसटीची आर्थिक स्थिती सुधारू लागली आहे. आणि महामंडळ पुरवत असलेल्या सुविधांमुळे देखील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.