एसटीच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असले, तरी अनेक बसचालक मोबाईलवर बोलताना आढळतात; तर काही चालक हेडफोन लावून गाणी, व्हिडिओ ऐकत असतात. अशा बसचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलणे यापुढे चालकांना महागात पडणार आहे. तसे आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई होणार आहे. ‘सुरक्षित प्रवास’ हे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करण्यास राज्यातील नागरिक प्राधान्य देतात; परंतु, अलीकडे मोबाईलवर बोलत बस चालवणाऱ्या चालकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
aतसेच काही व्हिडिओंमध्ये चालक मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकताना किंवा चित्रपट पाहतानाही आढळत आहेत. यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. मोबाईलवर बोलता बोलता निष्काळजीपणे अपघात होऊन प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यताही बळावली आहे. याबद्दल समाजमाध्यमांतून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच ही बाब महामंडळाने गांभीयनि घेतली आहे. एसटीतून दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. सवलतीमुळे एसटीची प्रवासीसंख्या वाढत असताना दुर्घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.
कारवाई करण्याचे आदेश – निष्काळजी चालकांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास, व्हिडिओ समोर आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची कारवाई करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्याला अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला.