कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने गुहागर येथून टॅग करून सोडलेल्या ‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ या दोन्ही कासवांचा उपग्रहाशी संपर्क नुकताच तुटला आहे. त्यांच्याशी संधान बांधण्यासाठी कांदळवन कक्षाचे संशोधक प्रयत्न करत आहेत. गुहागर येथून फेब्रुवारी महिन्यात दोन्ही कासव टॅग करून सोडण्यात आले होते. त्यातील बागेश्री हे कासव पश्चिम बंगाल नजीकच्या समुद्रात पोहोचले होते. हे दोन्हीही कासव २२५ दिवस उपग्रहाशी संपर्कात होते. त्यानंतर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ते संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. ‘गुहा’चा २१ सप्टेंबर, तर ‘बागेश्री’चा २३ सप्टेंबरपासून प्रतिसाद मिळत नाही.
समुद्रातील खारे पाणी आणि बदलते वातावरण याचा परिणाम होऊन ही यंत्रणा बिघडल्याची शक्यता कांदळवन कक्षाकडून वर्तवली आहे. लक्षद्वीपजवळच दीर्घकाळ फिरत असलेल्या गुहाच्या हालचालींवरून तिला तिथे चांगले खाद्य मिळाले असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. २३ जुलैपासून गुहा कासविणीच्या सॅटेलाईट ट्रान्समीटरचा प्रतिसाद बंद झाला; पण, काही कालावधीने सिग्नल पुन्हा मिळू लागले. मात्र गुहा आणि बागेश्री यांचा सॅटेलाईट संपर्क आता पूर्णपणे तुटला असून, तो पुन्हा मिळवण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. याला कांदळवन कक्षाकडूनही दुजोरा मिळाला आहे. कोकणातील १३ किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या प्रजाती अंडी घालतात.
विणीच्या हंगामात किनाऱ्यावर येणाऱ्या या मादी कासवांच्या अंड्यांचे नैसर्गिक तसेच मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या नुकसानीतून संवर्धन करण्यासाठी गेली अनेक वर्षे हे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्यावर बागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले मादी कासवांना महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. त्यांच्या प्रवासाकडे लक्ष ठेवणाऱ्या संशोधक आणि संवर्धकांना उपग्रहाद्वारे माहिती मिळत होती. डॉ. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास सुरू होता.