रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची दुसऱ्या लाटेतील स्थिती खूपच गंभीर बनली होती. सध्याच्या कोरोनाच्या अहवालानुसार रत्नागिरीमधील पॉझिटीव्हीटी दर वाढला असून, परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. राज्य तसेच जिल्हा शासन वेगवेगळ्या स्वरुपात अनेक उपाययोजना राबवत आहेच, पण जनतेने सुद्धा सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले म्हणाल्या.
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जिथे कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव अधिक आहे, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश अजूनही आहे. नागरिक स्वतःहून पुढे आले नाहीत. तर दुसरी लाट नियंत्रणात येणे कठीण आहे. स्वॅब तपासणीसाठी दिला की,अहवाल येईपर्यंत होम/ संस्था आयसोलेट होणे गरजेचे आहे. परंतु, नागरिक याबद्दल खूपच बेफिकीर दिसत आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले अनेक होम आयसोलेट होतात, परंतु नियम आणि घालून दिलेले निर्बंध पाळत नाहीत, बाहेर फिरत राहतात. सोबत संसर्ग देखील वाढवतात. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रशासनाकडून शिक्के मारणे, कारवाई करणे हे सर्व काटेकोरपणे घडत होतं. मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्याची जबाबदारी हि फक्त आरोग्य विभाग आणि प्रशासनाचीच आहे का? नागरिकांची याबाबत काहीच जबाबदारी नाही का?
नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो आहे, आरोग्य विभाग आणि प्रशासन आपल्या बाजूनी सर्व प्रयत्न करीत आहेत पण त्याचे कोरोना वाढल्याचे खापर मात्र आमच्यावर फोडले जाते, जिल्ह्यातील संक्रमीतांची संख्या काही कमी होण्याचे लक्षण दिसत नाही आहे, त्यात निर्बंध धुडकावून लावले तर सद्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन बसणार असल्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी त्यांनी दिला.

