राज्यात सध्या विविध किल्ले आणि गडांची डागडुजी आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातील रायगड किल्यावरील विद्युत वाहिन्या जुन्या झाल्याने अनेकदा पर्यटकांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे रायगडावरील अडचणी आणि समस्या लक्षात घेऊन एका ट्वीटद्वारे मांडण्यात आलेले. मुख्य करून विद्युत वाहिन्यांचा मोठ्या प्रमाणात समस्या मांडण्यात आल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचे अतिशय अवघड काम महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने पार पाडले आहे. यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रायगड किल्ला रात्रीही प्रकाशमान होणार असल्याची माहिती दिली.
रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रु. ६.०४ कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामाचा कार्यादेश दिनांक ५ मार्च २०२० रोजी देण्यात आला होता. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी हे अतिशय आव्हानात्मक व कठीण काम शिवकार्य म्हणून एकजुटीने व आत्मियतेने पूर्णत्वास नेले, याबद्दल या सर्वांचे ऊर्जामंत्री राऊत यांनी अभिनंदन केले.
रायगड किल्ला कलोशे वीज उपपेंद्रापासून १५ किमी अंतरावर आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची अंदाजे २८५० फूट इतकी आहे. तरीही वीज कर्मचारी व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करून आवश्यक भूमिगत केबल वजन अंदाजे ५१५ किलो व ४ वितरण रोहित्र वजन अंदाजे ७३४ किलो प्रत्येकी हाताने ओढत आणि खांद्यावर भार वाहून नेऊन सदर साहित्य गडावर पोचवण्यात आले याबद्दल डॉ. राऊत यांनी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.