पावसपाठोपाठ रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू केला आहे. भारतीय संस्कृतीला साजेसे आणि सभ्य, अंगभर वस्त्र, पोशाख घालूनच दर्शनासाठी या, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तोकडे, स्लीव्हलेस किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबत मंदिर समितीने भाविकांना व वेशभूषा संबंधी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. महिला किंवा मुलींसाठी गुडघ्यावर येणारे स्कर्टस किंवा शॉर्ट ड्रेसेस परिधान करू नयेत. असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावेत, असेही त्यात नमूद केले आहे. केवळ दहा वर्षांच्या आतील मुलांना या नियमातून सूट असेल असेही देवस्थान समितीने म्हटले आहे. मंदिराचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
हा नियम सक्तीचा नसून, मंदिराचे पावित्र्य राखा, अशी विनंती केल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गणपतीपुळे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात नियमावली तयार केली जात होती, मात्र आता एक फलक लावला आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील इतर अनेक मोठ्या मंदिरांमध्येही अशाच प्रकारचे नियम लागू करण्यात येत आहेत. रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध भैरी मंदिरातही वस्त्रसंहिताविषयक फलक लावून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.