तालुक्यातील कुंभवडे गावची वस्तीची एसटी बस घेऊन गेलेल्या बस चालकाने रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसटी चालक अनिल शिवाजी दिवसे (४१) मूळगाव नागदेववाडी ता. करवीर जि. कोल्हापूर असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनही चक्रावले आहे. श्री. दिवसे आणि वाहक सुभाष धोंडीराम मनगुडे रा. राधानगरी कोल्हापूर हे राजापूर एसटी आगाराची कुंभवडे वस्तीची गाडी घेऊन मंगळवारी गेलेले होते.
कुंभवडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी एका रूममध्ये चालक वाहकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी रात्री ८ च्या सुमारास चालक श्री. दिवसे फोनवर बाहेरच्या बाजूला बोलत होते आणि वाहक रूममध्ये होते. रात्री नऊ आणि साडेनऊच्या सुमारास जेवणाची वेळ झाली म्हणून वाहक यांनी दोन तीन वेळा फोन केला. मात्र त्यांचा फोन कायम बिझी लागत होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पुन्हा एकदा फोन लावला. फोन दरवाजा जवळ वाजत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहक बाहेर बघायला गेले. मात्र त्यावेळी दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तो दरवाजा हलवून हलवून त्यांनी उघडल्यानंतर बाहेरच्या बाजूला लोखंडी ग्रीलला श्री. दिवसे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. घाबरलेल्या वाहक यांनी तत्काळ आपल्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन माहिती दिली. रात्री बाराच्या सुमारास ‘सागरी पोलीस ठाणे नाटेचे कर्मचारी व राजापूर आगाराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ओणी प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे पाठविण्यात आला. दि.२८ऑगस्ट रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मात्र या एसटी बस चालकाने आत्महत्या का केली याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. एवढा वेळ तो चालक कोणाशी फोनवर बोलत होता. त्यांच्यामध्ये काय संभाषण झाले हे तपासातून निष्पन्न होऊन नक्की त्या चालकाने आत्महत्या का केली याचा लवकरच उलगडा झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. बागुल याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.