रत्नागिरीमध्ये नगरपालिकेने केलेल्या मोकाट उनाड गुरांच्या कारवाईबद्दल मागील दोन आठवड्यापासून ऐकतच आहे. पण शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील मार्गावर अनेक उनाड गुरे एकत्रित पणे वावरत असल्याने पूर्ण रस्ता अडवून बसलेली दिसून येत आहे. रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावर मोकाट गुरांचा उपद्व्याप वाहनचालकांना सहन करावा लागत असून त्यामुळे वाहन चालवताना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागत आहे. संबंधित उनाड जनावरांना कोंडवाड्यात टाकून संबंधित मालकांवर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
रत्नागिरी ते पावस या सागरी मार्ग यापूर्वी खड्ड्यांनी भरलेला होता, तेंव्हा त्या खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत होता. आता मात्र काही प्रमाणात डागडुजी करण्यात आल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र आता वाहने चालवताना मोकाट उनाड गुरांचा रस्त्यावर वावर असल्याने अनेक अडचणी येत आहेत. लगतच्या परिसरामधील शेतकरी, आपल्या जनावरांना कातळावर चरण्यासाठी सोडून जातात. प्रत्येक जण असलेली सर्व जनावरे कळपाने सोडतात, दिवसभर ती चाऱ्याच्या शोधात वणवण भटकत असतात तर सायंकाळच्या वेळी मालक नेण्यासाठी येतील या आशेने ही सर्व जनावरे रस्त्यावर कळपाने ठिय्या मांडून बसतात.
या जनावरांकडे मालक दुर्लक्ष करत आहेत. अनेक वेळा दुचाकीस्वार व इतर वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. सदरची जनावरे जखमी झाल्यानंतर नुकसान भरपाई मागण्याकरिता मालक तातडीने हजर होतात, मात्र ज्या जनावरांमुळे वाहनचालकांना मृत्यूला सामोरे जावे लागते त्यावेळी मात्र कोणताही मालक मदतीसाठी पुढे येत नाही, अशी स्थिती या परिसरामध्ये आहे. त्यामुळे याबाबत वारंवार तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.