घरगुती वादाचे प्रकरण चिघळल्याने एकाने चिपळूण नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. इमारतीच्या गच्चीवर चढून प्रथम मुलांना खाली फेकण्याचा प्रयत्न सुरु असताना, नगर परिषदेचे नगर अभियंता परेश पवार यांनी कर्मचाऱ्यांसह वेळीच तिथे धाव घेऊन दोन्ही मुलांना त्याच्या तावडीतून खेचून मागे ओढले. परंतु, काही वेळाने बापाने दुसर्या मजल्यावरून उडी मारली.
दळवटणे येथील महेश नारायण नलावडे असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. महेश नलावडे हा सध्या चिपळूण शहरातील खेंड परिसरामध्ये वास्तव्याला आहे. त्याला दोन लहान मुलगे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी व त्याच्यामध्ये घरगुती वाद उत्पन्न झाले होते. त्यामुळे सध्या ते विभक्त राहतात. त्यामुळे तो मानसिक रित्या तणावाखाली रहात होता. शुक्रवारी दुपारी तो दोन्ही मुलांना घेऊन बाजारपेठेमध्ये आला आणि परिषदेतील कर्मचाऱ्यांची नजर चुकवत तो थेट चिपळूण नगर परिषद इमारतीच्या दुसर्या मजल्यावर मुलांना घेऊन चढला.
इमारतीच्या गच्चीवर चढून त्याने प्रथम मुलांना खाली फेकण्याचा असफल प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेचे नगर अभियंता परेश पवार आणि काही कर्मचाऱ्यांनी यांनी धाव घेऊन दोन्ही मुलांना त्याच्या तावडीतून खेचून घेतले. परंतु, महेश नलावडे याने स्वतः मात्र इमारतीवरून उडी मारली. नगर परिषद कर्मचारी पोलीस व नागरिकांनी खाली ताडपत्री पकडून ठेवली होती. त्यामुळे तो थेट ताडपत्रीत पडल्याने बचावला आहे. नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. खाली ताडपत्रीमध्ये पडल्याने त्याचा जीव वाचला.