कालपासून सुरु झालेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा काल इंग्रजी विषयाचा पेपर होता. अनेक विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या तसेच वर्षभर केवळ ऑनलाईन अभ्यासपद्धतीच्या धर्तीवर तयारी करून परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले आहेत. दहावी आणि बारावी हि दोन बोर्डाची वर्षे म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी ठरतात. भविष्यात काय करायचे हे १२ वी च्या गुणांवर अवलंबून असते.
अनेकदा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करून जीवन संपवण्याचे टोकाचे पाउल उचलतात. काल इंग्रजी विषयाचा पेपर कठीण गेल्याने रत्नागिरी तालुक्यातील उत्कृष्ट ट्रेकर म्हणून ओळख असणारी वैष्णवी दयाराम श्रीनाथ हिने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
कारवांचीवाडी येथे राहणाऱ्या वैष्णवी दयाराम श्रीनाथ वय २१, रा. संकल्पनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी ही तरुणी परीक्षेचा अभ्यास करायला खोलीमध्ये जाते असे आईला सांगून या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास उघडकीस आली.
वैष्णवीच्या या घटने बद्दल ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी ही बारावीला असून तिची परीक्षा सध्या सुरू होती. ४ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर दिला होता. ५ मार्च रोजी सकाळी ती अभ्यास करायला रूममध्ये गेली होती. परंतु बराच वेळ झाला तरीही ती बाहेर न आल्याने तिच्या आईने दर वाजवले असता, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिचे वडील आणि भाऊ भाजी विक्रेते असून ते कामावर गेले होते. तिच्या आईने त्वरित तिच्या भावाला बोलवून घेतले, त्याने शेवटी दरवाजा तोडला असता समोरचे दृश्य पाहून आईने हंबरडा फोडला. तिने पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते.