मागील काही महिन्यांमध्ये रायगड जिल्ह्यात अनेक आपत्तीजनक वस्तू सापडण्याच्या घटना ताज्या असतानाच, मुंबई गोवा महामार्गावर पेणच्या जवळपास एक संशयास्पद वस्तू आढळून आली. ही वस्तू म्हणजे एक डमी बॉम्ब असल्याचं समोर आलं आहे. चार तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बॉम्ब शोधक पथकाला हा डमी बॉम्ब निकामी करण्यात यश आलं आहे. नवी मुंबई आणि रायगड बॉम्ब शोधक पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. त्यामुळे स्थानिकांसह पोलिसांनी देखील निश्वास सोडला आहे.
काही तासांपूर्वी भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सारख्या कांड्या सापडल्या होत्या. संध्याकाळी नदीपात्रात गेलेल्या एका व्यक्तीला त्या दृष्टीस पडल्या, त्यानंतर त्याने पोलिसांना या घटनेची खबर दिली. त्यानंतर तातडीने पेण पोलिस तसंच मुंबई आणि रायगडमधील बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. तपासानंतर ही वस्तू डमी बॉम्ब असल्याचं आढळून आलं. परंतु, हि वस्तू इथे कोणी ठेवली, यामागे नेमका कोणाचा हात आहे. याचा पोलीस कसोसीने तपास करत आहेत.
दरम्यान, अचानक अशा प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू परिसरामध्ये सापडल्याने आजूबाजूच्या भागामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा डमी बॉम्ब निकामी करण्यात दोन्ही पथकांना यश आले आहे. हा डमी बॉम्ब तयार करण्यासाठी यामध्ये वायर्स आणि डिजिटल घड्याळांचा वापर केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे नक्कीच कोणीतरी संबंधित माहितगाराचे हे कृत्य असल्याचे यामध्ये समोर आले आहे. आणि पोलीस यंत्रणा देखील त्याचा माग घेत आहे.