कोरोना काळामध्ये अनेकांच्या चांगल्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेक जणांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यामुळे त्या काळामध्ये आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मिळेल ते काम करून अनेकानी उपजीविका केली. महिला सुद्धा घराला आर्थिक हातभार लागावा म्हणून विविध प्रकारे श्रम करताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आता पुरूषांबरोबरच महिला रिक्षा चालकही नजरेस पडले तर नवल वाटायला नको. दुर्गाशक्ती आणि श्रृतिका मोटर ट्रेनिंग स्कूलने महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ म्हणून रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सुरूवातीला दहा महिलांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे दुर्गाशक्ती संस्थेच्या अश्विनी भुस्कुटे यांनी माहिती दिली.
चिपळुणातील महिलांनी, उदरनिर्वाहासाठी रिक्षा व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. दुर्गाशक्ती आणि श्रृतिका मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. व त्यादृष्टीने आवश्यक ट्रेनिंग घेण्याचा शुभारंभ नुकताच दुर्गाशक्तीच्या अध्यक्षा अश्विनी भुस्कुटे, श्रृतिका मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक महेश पंडीत यांच्या उपस्थितीत सौ. रिया पाथरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
सौ. रिया पाथरे या शहरातील प्रथम महिला आहेत ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालवण्याचे ट्रेनिंग, लायसन्स बॅच व परमिट घेवून रिक्षा चालक व मालक होण्याचा बहुमान मिळवला. दुर्गाशक्तीच्या अध्यक्षा अश्विनी भुस्कुटे या ५० सिटर बस चालक म्हणून सर्वांना परिचित आहेत. महिलांनी शिलाई काम, ब्युटीशियन असे पारंपारिक उदरनिर्वाहाचे साधन न निवडता जरा हटके करिअर निवडावे, रिक्षा चालक म्हणून मला या शहरात महिला दिसायला हव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अश्विनी भुस्कुटे यांनी सांगितले. प्रथम १० महिलांना मोफत रिक्षा ड्रायव्हिंग शिकविण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.