पाकिस्तानमधील धुळीचे वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रावर धडकल्याने अरबी समुद्रामध्ये वारा, पाऊस आणि धुळीचे एकत्रीकरण होऊन वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत असलेला मासेमारी व्यवसाय अजूनही जैसे थे परिस्थितीच आहे. उत्तरेकडून जोरदार सोसाट्याचे वारे दक्षिणेकडे वाहत असल्याने हर्णे बंदरातील नौकांनी मिळेल त्या बंदराचा तसेच खाड्यांचा आधार घेतला आहे. पुन्हा एकदा अतरंगी झालेल्या वातावरणामुळे मासळी उद्योगावर ऐन हंगामात संक्रांत आल्याने मच्छीमार चिंतेत पडला आहे.
वातारणाच्या चाललेल्या लहरी पणामध्येच हर्णे बंदरात फास्टर नौकांमुळे मासळी दुष्काळ पडला होता. पारंपारिक मच्छिमार्याना मासेच मिळत नसल्याने, हाल झाले आहेत. त्यावर नैसर्गिक आपत्तीनी मागील दोन वर्षापासून महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात अवकाळी पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात थंडीने उच्चांक गाठला आहे.
गेले दोन दिवसांत कोकण सह मुंबई, पुणे, नाशिक येथे तुरळक पाऊस देखील पडला. तसेच या वादळामुळे गेले दोन दिवस उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत. अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्याच्या परिस्थितीमुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या नौकांची तारांबळच उडाली. मिळेल त्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी आसरा शोधला आहे.
रत्नागिरी बंदरात २०० नौका, हर्णे बंदरात साधारण ४०० नौकांनी तर जयगड खाडीत १०० ते १५० नौका तर आंजर्ले खाडीत १०० नौकांनी आसरा घेतला आहे. अजूनही पुढील दोन दिवस असच शांत रहावं लागणार आहे. जोपर्यंत हे वादळी वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आम्ही मासेमारीकरिता जाऊ शकत नाही असे येथील स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.