हवामान विभागाने कोकण विभागामध्ये हलक्या पावसाच्या सरी पडणार असल्याचे भाकीत केले होते. त्याप्रमाणे, रत्नागिरीतील काही तालुक्यांमध्ये मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या.
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रात पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. रत्नागिरीतही या धुळीचा प्रभाव दिसून येत आहे. या धुळीने वाहन चालकांसह नागरिकही बेजार झाले आहेत. रविवारी सुट्टी असल्याने वर्दळ रस्त्यावर कमी दिसून आली. परंतु, लांबच्या लांब धुळीचे वातावरण सर्वत्र दिसून येत होते.
जिल्ह्यात सकाळी हलक्या मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यानंतर दिवसभर सगळीकडे धुळीचे वातावरण दिसून येत आहे. दिवसभरात ऊन सावलीचा लपंडाव सुरु असल्याने मळब आल्यासारखे वातावरण दिसत होते. या धुळीचा जास्त फटका दुचाकी चालकांना बसत आहे. दुचाकी चालवताना ही धूळ डोळ्यामध्ये जाते आणि हेल्मेटची काच ओढली असता काचेवर हे धुळीचे कण साचत असल्यामुळे पुढचे काहीच दिसण्यास कठीण जात होते.
डोळे उघडे ठेवावेत तर धूलीकणाचा त्रास आणि हेल्मेटची काच लावली तर त्यावर धूळीचा थर साचतो अशी परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे नेमकं कसा प्रवास करावा ? असा प्रश्न वाहन चालकांना पडला होता. आणि वातावरणामध्ये वारंवार होणार्या बदलामुळे कोरोना व त्याच्या बदलणाऱ्या स्वरूपामुळे इतर शारीरिक व्याधींनी ग्रस्त नागरिकांना आता श्वसनाचे विकार, ताप, सर्दी, डोकेदुखी, अवयव दुखी अशा आजारांचा त्रास होताना दिसत आहेत.