तालुक्यातील फणसोप जुईवाडी येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या दत्तमंदिराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देवस्थान कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले. या वेळी झालेल्या ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात सपना भुवड पैठणीच्या मानकरी ठरल्या. फणसोप-जुवीवाडी येथील दत्तजयंती कार्यक्रमात विश्वनाथ भाटेबुवा यांचे व उल्हास लाड बुवा कसोप यांचे भजन झाले. या प्रसंगी श्री क्षेत्र चिखली दक्षिण काशी कोल्हापूर येथून श्री गुरुदत्तांच्या पादुका फणसोप गावी आणण्यात आल्या. त्यांची भव्य मिरवणूक श्री देव लक्ष्मी केशव मंदिरापासून दत्तमंदिरापर्यंत काढण्यात आली.
त्यानंतर पादुकांचे पूजन करण्यात आले व दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. त्याच दिवशी महिलांसाठी पाककला स्पर्धा व रात्री कोकणचा साज संगमेश्वरी बाज या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३४५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात लहान गटात श्रुतिका शिंदे, आरूषी नाईक, ऐश्वर्या मनोरकर, पर्णी विलणकर यांनी यश मिळवले. मोठ्या गटात ऋत्विक सनगरे, साजिरी पावसकर, शुभम रसाळ व अभिषेक घवाळी, ओम साटम यांना यश मिळाले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी प्रायोजित केली होती.
महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात १३३ महिलांनी सहभाग घेतला. त्यापैकी सपना भुवड या पैठणीच्या मानकरी ठरल्या व समीक्षा कोळेकर यांना उपविजेतेपदाची ! सोन्याची नथ मिळाली. या व्यतिरिक्त १८ महिलांना विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. प्रेक्षकातील महिलांनाही जवळपास ३० बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश साळवी यांनी केले.
दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी दत्तमहाराजांच्या मूर्तीवर व धरणावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दत्तगुरूंची भिक्षा मागितली गेली. त्या दिवशी शाहीर वृदाली दळवी आणि शाहीर वसंत भोईर यांच्यात शक्तीतुऱ्याचा जंगी सामना झाला. देवस्थानचे अध्यक्ष तुषार सुरेंद्र साळवी यांनी आभार मानले. हे सर्व कार्यक्रम ज्येष्ठ ग्रामस्थ सतीश साळवी, अनंत साळवी, मनोज साळवी, मनिष साळवी, उपाध्यक्ष राकेश साळवी, सचिव राजेश अडकेल, खजिनदार निखिल साळवी, सदस्य सुधीर साळवी यांच्यासह अन्य सर्वांच्या सहकार्याने झाले.