चाळीस वर्षांपूर्वी वडिलोपार्जित श्री गणपती कलाकेंद्रात नवीन काही करण्याच्या इच्छेने शाडू माती आणि कागदाचा लगदा करून पर्यावरणपूरक सुबक श्री गणेशमूर्ती तयार झाल्या. जिल्ह्यात परजिल्ह्यास आणि अमेरिकेसारख्या देशात माझ्या गणेशमूर्तींना मागणी यावी, यासारखा आनंदाचा क्षण नाही, असे भावोद्गार तालुक्यातील गणेशगुळे येथील प्रसिद्ध मूर्तिकार ज्ञानेश कोटकर यांनी काढले. येत्या २५ ऑगस्टला गणेशमूर्ती विक्रीसाठी पोहोचणार असून मागणीही वाढली; मात्र यावर्षी मूर्ती पाठवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे ही संकल्पना घेऊन वडिलोपार्जित चित्रशाळेत राबवली.
हलक्या आणि पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती लोकांपर्यंत पोहोचल्या; मात्र या मूर्ती तयार करताना मनुष्यबळही तितकेच महत्त्वाचे होते; पण यावरही मात करून आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्य मित्रपरिवाराने सहकार्य केले. गणेशगुळेसारख्या ग्रामीण भागातील कारागिरांसाठी रोजगार निर्मिती झाली. चारशे ते पाचशे सुबक मूर्ती तयार होतात. मूर्तीसाठी आणलेला कागद वेचून भिजवायला ठेवावा लागतो; मात्र या कागदामध्ये फोटोग्राफीचा डिजिटल कागद नसावा.
कागद अथवा पुठ्ठा दोन ते तीन दिवस पाण्यात कुजवून घेतल्यानंतर मिक्सर ग्राईंडरवर कागद आणि शाडूची माती असे माध्यम वापरून श्री गणेशमूर्तीच्या विविध पोझमधील सुबक मूर्ती साच्यातून तयार करण्यात येतात. या व्यवसायाला जिल्हा व परजिल्ह्यातूनही मागणी वाढली. दरम्यान, अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती तालुक्यातील गणेशगुळे-वझरेकरवाडी येथून टेम्पोने रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा (इंदिरा गोदी) येथे पाठवण्यात आल्या.