रत्नागिरी जिल्ह्यातील एका बड्या उद्योजकावर गुरुवारी सकाळी भल्या भल्यांची झोप उडविणाऱ्या ईडीने छापा पहला असून प्रचंड पोलिस बंदोबस्तात तेथे ईडीच्या (सक्त वसुली संचलनालय) अधिकाऱ्यांकडून तपासणीचे काम सुरू होते. मात्र या छाप्यामध्ये ईडीच्या पथकाला नेमके काय आढळले आणि कशा संदर्भात हा छापा होता याची माहिती मिळू शकली नाही. कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कंपनी परिसरात अन्य कोणालाही तो फिरकू देत नसल्याने चर्चाना पेव फुटले आहे. दरम्यान साधारणपणे वर्ष दीडवर्षापूर्वी खेडमधील एका उद्योजकाच्या फार्महाऊसवर असाच छापा पडला होता. त्याची आठवण गुरूवारी पडलेल्या ईडीच्या छाप्यांने जागी झाली आहे.
दोन ठिकाणी एकाचवेळी छापा – अधिक वृत्त असे की, गुरूवारी ११ डिसेंबर रोजी, सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने या प्रसिद्ध उदयोजकाच्या सावर्डे आणि भरणे नाका या दोन्ही ठिकाणच्या कार्यालयांवर छापा टाकला. या कंपन्या कात उद्योगाच्या आहेत. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी छापेमारी झाल्याचे वृत्त हळूहळू पसरले आणि खळबळ उडाली.
प्रचंड पोलिस बंदोबस्त – ऐन कडाक्याच्या थंडीत हा छापा पडल्याने अनेकांची झोप उडाली आहे. भरणे नाका आणि सावर्डे या दोन्ही ठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जसजसे छाप्याचे वृत्त कळले तसतसे अनेक लोक या कार्यालयाकडे येवू लागले. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.
चौकशी सुरू – साधारणपणे सकाळी ७.३० वाजता ईडीचे पथक सावर्डे आणि भरणे नाका येथे पोहोचले आणि चौकशी सुरू झाली. उद्योजकाकडून या संपूर्ण कारवाईला पुर्णतः सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांनीही अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ईडीने हा छापा कशासाठी टाकला?, त्यांना कोणत्या प्रकरणाची चौकशी करायची आहे याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
मोठे पथक – या दोन ठिकाणी एकाचवेळी धाडी पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही पथकांमध्ये ईडीचे अनेक अधिकारी समाविष्ट असल्याचे समजते. त्यांच्यासोबत पोलिस फौज फाटाही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. नेमकी कसली चौकशी सुरू आहे याविषयी कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. अनेक कागदपत्र तपासण्यात येत आहेत. विशेषतः आर्थिक नोंदींबाबत तपासणी सुरू आहे, असे कळते.
नामवंत उद्योजक – ज्या उद्योजकाच्या कंपनीवर ईडीची धाड पडली आहे ते उद्योजक नामवंत असून संपूर्ण जिल्हयात ते प्रसिद्ध आहेत. अनेक राजकीय नेते मंडळींशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे या छाप्यांविषयी अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत ईडीचे पथक छाननी करत होते. ईडीकडून अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कंपनीच्या परिसरात अन्य कोणालाही फिरकू दिले जात नाही. त्यामुळे चर्चाना पेव फुटले आहेत.
वर्ष – दिडवर्षापूर्वी धाड – साधारणपणे वर्ष-दिडवर्षापूर्वी ईडीचे पथक हे कोकणात मुरुड येथील एका रिसॉर्टशी संबंधित वाद सुरू असताना दाखल झाले होते. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या अनेक फेऱ्या कोकणात झाल्या होत्या आता पुन्हा एकदा कोकण ईडीच्या रडारवर आल आहे. त्यामुळे कोकणातील उद्योजकांची झोप उडाली आहे.

