जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ मिळविलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितंसिह डिसले यांना अमेरिकेत जाऊन पीएच. डी करायची आहे. त्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या त्यांनी अध्ययन रजेसाठी अर्ज दिला होता.
डिसले गुरुजी यांनी यासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन अध्ययन रजे संबंधित समस्या सांगितली. त्यावर स्वामी यांनी डिसले यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची भेट घेऊन समस्या त्यांच्या समोर मांडण्यास सांगितले. त्यानुसार डिसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन अध्ययन रजेची परवानगी मागितली.
शिक्षणाधिकारी लोहार यांनी तेव्हा अध्ययन रजेचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगत, तुम्ही अमेरिकेत पीएच.डी करण्यासाठी गेल्यावर शाळेचे काय करणार, असा सवाल केला. तुमच्या या उपक्रमामुळे येथील मुख्य अध्यापनाच्या कामाचे काय होणार? अशी विचारणा करत एवढी प्रदीर्घ रजा मिळणे शक्य होणार नाही असे सांगितले त्यामुळे यासाठी तुम्हीच उवर प्रथम पर्याय सुचवा, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी फर्मावले.
या प्रकारामुळे सोशल मीडियावरून तसंच सामाजिक, राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर सदर प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्तीशः लक्ष घातलं असून डीसले गुरुजींची रजा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रभर चर्चा होत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशात स्कॉलरशिपसाठी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तयार केलेल्या चौकशी अहवालावर पडदा टाकून सुट्टी मंजूर केल्याची देखील चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून, जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिले.