प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार, असे साधारण प्रत्यके वर्षीचे चित्र आपण पाहतो. परंतु, गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे अख्खा देश बंद आहे. कोरोना महामारीचा प्रभाव जसा इतर कार्यक्षेत्रांवर झाला आहे, तसाच शैक्षणिक क्षेत्रावरही झालेला आहे.
मागील वर्षापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, सर्व शिक्षण हे ऑनलाईन करण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट हि फक्त आता ऑनलाईन होत आहे. या शैक्षणिक वर्षाला आज पासून आरंभ होत आहे. अनेकांच्या सोशल मिडीयावर मिसिंग स्कूल डेज अशा प्रकारचे स्टेट्स पहायला मिळत आहेत. १५ जूनच्या आधी १० दिवस साधारण शाळेची नवीन पुस्तके, वह्या, युनिफॉर्म, दफ्तर, टिफिन, बॉटल, शूज, रेनकोट, छत्री एक न अनेक गोष्टींची खरेदी या दरम्यान होते. परंतु, यावर्षी सुद्धा प्रत्यक्ष शाळेत न जाता ऑनलाईन शाळेची भेट घडणार आहे.
रत्नागिरीमध्ये शिक्षणाधिकारी बंडगर यांनी शैक्षणिक वर्षाचे परिपत्रक जाहीर केले असून, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला शाळेचे कामकाज सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शिक्षकांना कोविडची ड्युटी लावली गेली आहे, त्या शिक्षकांना वगळून इतर सर्व शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेमध्ये उपस्थित राहून, ऑनलाईन दैनंदिन अध्यापनाचे काम आणि शालेय कामकाज सुरु करायचे आहे. ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरात आहेत, त्या शाळा शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल नंतर कळविण्यात येणार असून, त्या शिक्षकांनी सुद्धा ऑनलाईन अध्यापनाला सुरुवात करायची आहे. या काळात कोरोना नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. असे आदेश शिक्षण विभागाकडून देंण्यात आले आहेत.