गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग भक्तांसाठी सुरक्षित असावा या उद्देशाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिंवेंद्रराजे भोसले हे गुरूवारपासून दोन दिवस या महामार्गाच्या पाहणीसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यांवर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यातून नेमके काय साध्य होते आणि महामार्गामुळे जनतेला सध्या जो त्रास भोगावा लागतो आहे, तो किती कमी होतो? याकडे लक्ष लागले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ना. भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. त्यासाठी त्यांचा विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. त्या पाहणीच्यावेळी घेतल्या गेलेल्या निर्णयांचे काय झाले? आणि महामार्ग कितपत सुरक्षित आहे? हे पाहण्यासाठी ते आता पुन्हा येत आहेत. गेली १४ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. त्याचा त्रास येथील जनतेला सोसावा लागत आहे.
साऱ्या देशात रस्त्यांचे जाळे उत्तमपणे विणण्याचा विक्रम ज्यांनी केला आहे, त्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाच्या कामापुढे अक्षरशः हात टेकले आहेत. रविंद्र चव्हाण हे मागील सरकारमध्ये बांधकाम मंत्री होते. त्यांनी देखील वेळोवेळी पाहणी केली. मात्र त्यातून महामार्ग किती सुधारला आणि येथील जनतेला काही दिलासा मिळाला का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर ना. शिवेंद्रराजे भोसले हे गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पाहणी दौऱ्यावर येत आहेत. कशेडीपासून त्यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे. प्रत्येक टप्प्यांची पाहणी ते करणार असून उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. मात्र याआधी ज्या उपाययोजना ठरल्या होत्या, त्यानुसार काम झाले का? हा कळीचा प्रश्न आहे.
हा संपूर्ण प्रकल्प १० टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. त्यातील आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन टप्प्यांवर अनंत अडचणी आहेत. पूलांची कामें अपेक्षित गतीने झालेली नाहीत. धामणी, रेल्वेपूल, काकजेवठार निवळी, लांजा याठिकाणी अडचणी आहेत. कुरधुंडा, कोळंबे येथेही मंद गतीने काम सुरू आहे. याबाबत मंत्रीमहोदय काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. महामार्गावर काही अपघात स्पॉट निर्माण झाले आहेत. तेथे काय उपाययोजना करणार? याचे उत्तर जनतेला हवे आहे.