या वर्षी पावसाने जेमतेम सरासरी गाठली आहे. भात लावणीवेळी पावसाने मारलेली दांडी आणि कापणीत पडलेला अवकाळी पाऊस यामुळे भात शेतीचे नुकसान झाले होते. यंदा खरीप हंगाम अडचणीत आला होता; मात्र त्यामधून सावरलेल्या शेतकऱ्यांना भात खरेदीच्या शासकीय दरात वाढ मिळाल्याचा फायदा झाला आहे. या वर्षी जिल्हा खरेदी-विक्री संघाकडे साडेआठ हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे. त्या मधून २ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपयांची उलाढाल झाली. शासकीय दरामध्ये या वर्षी झालेल्या वाढीचा फायदा उचलत रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे या वर्षी तब्बल २ हजार ८३६ क्विंटल भात विक्री केली आहे.
भात विक्रीतून या वर्षी ९७ लाख ८५ हजार ४४० रुपयांची उलाढाल झाली. भात विक्री मोबदल्याची बहुतांश ९५ टक्क्यांहून अधिक रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याने शेतकऱ्यांना हा मोबदला ताबडतोब मिळाला आहे. या वर्षी आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस, त्यामध्ये आलेला नद्यांना पूर यामुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले. या स्थितीमध्ये भात खरेदीच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
याचा फायदा उचलत अनेक शेतकऱ्यांनी खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून भात विक्री केली. राजापूर तालुक्यात खरेदी-विक्री संघाच्या पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भात खरेदी करण्यात आली. त्यामध्ये राजापूर येथे १२६५.६० क्विंटल तर पाचल येथे १५७०.४० क्विंटल असे मिळून २ हजार ८३६ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली. यासाठी जिल्ह्यात १४ केंद्रे स्थापन करण्यात आली होती. आतापर्यंत १२ हजार ३९२ क्विंटल भात विक्री करण्यात आली आहे. गतवर्षी ३३ हजार २४०.८० क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतात. या वर्षी प्रतिक्विंटल २ हजार १८३ रुपये दर देण्यात आला होता. या वर्षी आतापर्यंत १२ हजार ३९२ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे.