जादा व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या रकमेच्या ठेवी जमा करत एका कंपनीने राजापूर तालुक्यातील अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी चौघांनी फसवणूक केल्याची तक्रार संबंधित कंपनीविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्या चार जणांची मिळून सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून तपास सुरू केल्याची माहिती राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली. राजापूर शहरानजीक एका कंपनीने पुनर्वसन वसाहतीत काही दिवसांपूर्वी कार्यालय सुरू केले.
ठेवींवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्तीही केली गेली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करून अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी पुढे येऊन याविरोधात तक्रार नोंदवा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुर्नवसन वसाहतीत कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती केली. व्याजदर अधिक असल्यामुळे अनेकांनी मोठमोठ्या रकमांच्या ठेवी जमा केल्या. पिग्मीच्या माध्यमातून दररोज पैसे जमा करण्यात आले.
त्यात काही छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसह काही रिक्षा व्यवसायिकांनीही पिग्मी खाती या कंपनीत सुरू केली होती. त्या कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे सर्व पिग्मीधारकही गोंधळले आहेत. पिम्मी एजंटांकडे आमचे पैसे द्या, असा तगादा लावला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौघांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. कार्यालय गेले काही दिवस बंद आहे. पोलिसांनीही या ठिकाणी भेट देवून पाहणी केली आहे. त्यामुळे राजापूरकरांना लाखोंचा गंडा घालून या कंपनीने गाशा गुंडाळल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.