शहरातील अतिथी हॉटेलचे मालक व उद्योजक प्रकाश देशमुख यांनी चिपळूण पालिकेचा तब्बल २ कोटी घरपट्टी कर थकवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ७ दिवसांत ही रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. कराची रक्कम जमा न केल्यास थेट मालमत्ता जप्तीचा इशारा नोटीसीद्वारे दिला. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र पालिकेने जप्तीच्या कारवाईची नोटीस बजावल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील अतिथी हॉटेलचे मालक व उद्योजक देशमुख यांनी चिपळूण पालिकेचा तब्बल १ कोटी ९८ लाख ६१ हजार ७०३ रुपये इतका कर थकवला.
परंतु इतका कर थकला कसा आणि पालिका प्रशासन अद्याप गप्प का होते, असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. परंतु या सर्व प्रश्नांची उकल देखील आता होऊ लागली आहे. प्रत्यक्षात काही वर्षांपासून हा वाद सुरू आहे. पालिकेने आपल्या मालमत्तेची चुकीची आकारणी करून कर लादल्याचे देशमुखांचे म्हणणे आहे. याच मुद्दयावर त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु जिल्हा न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली.
मात्र त्यावर स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पालिकेचा कर वसुलीचा मार्ग मोकळा झाला होता. अनेक महिने याप्रकरणी कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी या थकीत कराबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पालिकेने पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.