चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एचएम पीव्ही (ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस) विषाणूने कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही प्रवेश केल्याने चिंता वाढली आहे. नागपूरमधील २ बालकांना या व्हायरसची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. असे असले तरी ही दोन्ही बालके या विषाणूच्या बाधेतून बरी झाली असून ती सध्या त्यांच्या घरी उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूरमध्ये जरी या व्हायरसची बाधा झालेले दोन रूग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हा व्हायरस नवा नाही याआधीही याची बाधा काहीजणांना झाली होती. ते बरेही झाले. चीनमधील व्हायरसपेक्षा हा व्हायरस थोडा वेगळा आहे. काळजी घ्यावी असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी बंगळुरूमधील दोन बालकांना या विषाणूची बाधा झाल्याचे निदर्शनास आले होते. बंगळुरूमध्ये या विषाणूने भारतात प्रवेश केला.
गेल्या चार दिवसांत भारतात याचे संशयित रूग्ण आढळले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत आरोग्ययंत्रणेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या या विषाणूची बाधा झालेले ८ रूग्ण देशात आहेत. त्यामध्ये बंगळुरूमधील २, गुजरातमध्ये १, पश्चिम बंगालमध्ये १ आणि तामिळनाडूमध्ये २ संशयित रूग्णांचा समावेश आहे. नागपूरमध्ये २ जणांना बाधा झाली होती. नागपूरमध्ये २ मुलांना बाधा नागपूरमध्येही या एचएमपीव्ही व्हायरसची बाधा झालेले २ संशयित रूग्ण आढळले होते. एक १३ वर्षाची मुलगी आणि १० वर्षाचा मुलगा या दोघांना याची लागण झाली होती. गेल्या आठवड्यातच हे उघड होताच त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती बरी झालेली आहे. त्यामुळे सध्या ते रूग्ण नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांच्यावर त्यांच्या घरातच डॉक्टर देखरेख ठेवून आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असे नागपूरच्या आरोग्य संचालकांनी सांगितले आहे.
कोरोना नाही – चीनमध्ये एचएमपीव्हीने धुमाकूळ घातला असून या पार्श्वभूमीवर या विषाणूचे रूग्ण भारतात आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनासारखी साथ पसरेल की काय अशी भीती वाटत आहे. मात्र हा कोरोना नाही. कोरोनापेक्षा याची लक्षणे खूपच माईल्ड आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी. हात स्वच्छ पाण्याने धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर शक्यतो राखावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी यंत्रणा अलर्ट; आयसोलेशन युनीट सज्ज – कोरोनाचा अनुभव असल्याने यावेळी शासकीय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आवश्यक त्या गोष्टींचा साठा आहे की नाही याचा आढावा देशाचे आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी घेतला. तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनीही उपाययोजनांचा आढावा घेतला. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर शहरांत आयसोलेशन युनीट (विलगीकरण कक्ष) सज्ज ठेवण्यात आले आहेत.