सागरी क्षेत्रात अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा – सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून अंमलबजावणी कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामुळे सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ होईल, असे मत्स्यव्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी मुंबईत सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सह आयुक्त (सागरी) महेश देवरे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, उपसचिव किशोर जकाते, यासह कोकण विभागातील मत्स्य व्यवसायासह आयुक्त आणि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाश्वत मासेमारी टिकून राहण्याकरिता अनधिकृत मासेमारी नौकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना झाली. सागरी सुरक्षेसाठी किनारपट्टी भागात ड्रोनद्वारे गस्त सुरू केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे राणे यांनी सांगितले.
परप्रांतीय मासेमारी नौका राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. एलईडी मासेमारी विषयी कठोर कारवाई करणे आणि स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे हित जपणे ही शासनाची भूमिका आहे. त्यानुसार अंमलबजावणी कक्ष स्थापना करण्यात आला आहे. या कक्षातील सर्वच सदस्यांनी जबाबदारीने आणि सहकार्याने काम करावे, अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या आहेत. मंत्री राणे म्हणाले, या अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरक्षा आणि मासेमारीस एक शिस्त येईल. तसेच अवैध हालचालींवरही नियंत्रण आणणे आणि कडक कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत, हीच विभागाची भूमिका आहे. त्यासाठी या अंमलबजावणी कक्षाची भूमिका महत्वाची असेल. किनाऱ्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची हा कक्ष कार्यवाही करणार आहे. याबाबतचा कृती आराखडा तयार करून तीन महिन्यांमध्ये किनारपट्टी मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या सर्व जागा अतिक्रमणमुक्त करा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या आहेत.
कक्षाची कामे – मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी कक्षात मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अध्यक्ष असतील. तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव हे सदस्य आहेत. मत्स्यव्यवसाय (सागरी) सहआयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत. परप्रांतीय अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणे, कक्षाची संरचना, संविधानिक चौकट व निधीची तरतूद यांचा अभ्यास करणे, परप्रांतीय अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ यांचा अभ्यास करून याबाबत शासनाला उपाययोजना सुचवणे हे कक्षाचे काम राहील.