गतवर्षी मार्च महिन्यामध्ये शिमगोत्सवाचा ढोल घुमू लागताच होळी पौर्णिमेच्या पहाटेच्या दरम्यान उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर, गेल्या सुमारे दहा महिन्यांपासून गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री प्रवाहीपणे वास्तव्य कायम राहिलेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गंगामाईचे आगमन आणि निर्गमनामध्ये स्थित्यंतर आलेले असताना गंगामाईच्या मूळ गंगा, गायमुख आणि चौदा कुंडांमधील पाण्यामध्ये गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये मात्र, फारसा कोणताही कमी-जास्त प्रमाणात फरक झालेला नसल्याचे गंगा देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी सांगितले. वास्तव्याच्या काळामध्ये सुमारे साडेचार लाख भाविकांनी गंगास्नानाची अनुभूती घेतली असून, त्यामध्ये राज्याबाहेरील भाविकांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी मार्च महिन्यामध्ये गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. त्यानंतर अजूनही गंगामाई उन्हाळे तीर्थक्षेत्री प्रवाही आहे. गंगास्नान हे पवित्र स्नान मानले जात असल्याने गंगामाईच्या वास्तव्याच्या काळामध्ये राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविक पवित्र गंगास्नानाची पर्वणी साधण्यासाठी तीर्थक्षेत्री येतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यांतील लाखो भाविकांनी गंगास्नानाचा लाभ घेतला.
२०११ पासून गंगेचे दरवर्षी आगमन – पाताळातून प्रकट होणाऱ्या गंगामाईचे उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री दर तीन वर्षांनंतर आगमन होते. आगमनानंतर पुढील सर्वसाधारण तीन महिने गंगामाईचे या ठिकाणी वास्तव्य असल्याचा इतिहास आहे. अठराव्या शतकात सलग ३७ वर्षे (१८०१-१८३७) दरवर्षी येणारी गंगा त्या नंतरच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे तीन वर्षांनंतर येत होती; मात्र २०११ पासून सातत्याने दरवर्षी गंगामाईचे आगमन होत असल्याचे चित्र आहे. २००९ पूर्वीच्या गंगामाईच्या वास्तव्याचा विचार करता सर्वसाधारणपणे ते सरासरी अडीच-तीन महिने वास्तव्य राहिले आहे. मात्र, त्यानंतरचे तिचे वास्तव्य पाहता ते शंभरहून अधिक दिवस वास्तव्य असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.