पाऊस आता सुरू झाला आहे. यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवतो आहे. विहीरी, तलाव, नदी, नाले यांचे पाणी चांगलेच गार लागत असतानाच कोकरे गावातील एका विहिरीचे पाणी मात्र सतत गरम आहे. ऐन पावसाळ्यात गरम पाणी देणारी ही विहीर पाहण्यासाठी आता अनेक जण भेट देऊ लागले आहेत. कोकरे घाणेकरवाडीतील संजय दळवी यांच्या जमिनीत ही विहीर आहे. २ वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदण्यात आली. काही अंतरावरच पाणी लागले. पण काय आश्चर्य या विहिरीचे पाणी चक्क गरम आहे. जणू काही गरम पाण्याचे कुंडच. या विहिरीतून गरम पाणीच येते. हा एक चमत्कार मानला जात आहे. ज्यांच्या जमिनीत ही गरम पाण्याची विहीर आहे ते संजय परशुराम दळवी यांनी सांगितले की, कोकरे घाणेकरवाडीमधील ही जमीन त्यांनी घर बांधण्यासाठी खरेदी केली.
घर बांधण्यापूर्वी त्यांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३० मार्च २०२१ रोजी त्यांनी बोअरवेलची खोदाई सुरू केली. काही फुटांवरच पाणी लागले. मात्र ते कमी पडू नये यासाठी आणखी १५ फूट खोदाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही खोदाई सुरू असताना या विहिरीतून अचानक गरम पाण्याचे फवारे बाहेर उडू लागले. जणू काही कारंजे आहे अशा पद्धतीने विहिरीतून गरम पाण्याचे फवारे येत असल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. अनेकांनी ही गरम पाण्याची विहीर पाहण्यासाठी गर्दी केली. शासकीय अधिकारी आणि भूगर्भ शास्त्रज्ञ हेदेखील आले. मात्र या विहिरीतून गरम पाणी कसे काय येते याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. संगमेश्वर तालुक्यात आरवली परिसरात आणि दापोली तालुक्यात उन्हवरेमध्ये गरम पाण्याची कुंडे आहेत.) गेली अनेक वर्षे ही कुंडे असून त्यामधून सतत गरम पाणी वाहत असते. त्याप्रमाणे संजय दळवी यांच्या मालकीच्या या विहिरीतूनही दिवस-रात्र २४ तास गरम पाण्याचे झरेच वाहत असतात. आता पर्यटक या विहिरीकडे आकर्षित होत आहेत.