माझी वसुंधरा अभियानांतर्गत चिपळूण पालिकेने प्रदूषणमुक्तीसाठी अनोखा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता दर महिन्याच्या १ तारखेला अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक सायकल चालवणार आहेत. तसेच, चालणारही असून त्याचा प्रारंभ नववर्षाला १ जानेवारीपासून होणार आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहर हर स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले आहे. यामुळे पालिकेला अलीकडे स्वच्छतेसाठी पारितोषिके प्राप्त झाली आहेत. स्वच्छतेत अव्वल होण्यासह प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी शासनाच्या या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात सायकलने येणार आहेत. ज्यांना सायकल चालवणे शक्य नाही ते चालत येणार आहेत. या उपक्रमाला अधिक व्यापक रूप देऊन शहर अधिकाधिक प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांना बरोबर घेण्याचे ठरवले आहे. यातूनच सोमवारी नागरिकांची इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात बैठक घेण्यात आली.
उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्याचा विचार करता याची गरज असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी या उपक्रमाला सहकार्य करताना शहरात ज्यांच्याकडे जुन्या सायकल आहेत त्यांनी त्या पालिकेला द्याव्यात. त्यातील ५० सायकल आम्ही आमच्या खचनि दुरुस्त करून देऊ, असे जाहीर केले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश काणे, माजी नगरसेवक शिरीष काटकर, मिलिंद कापडी, उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे जयंद्रथ खताते, भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, ग्लोबलचे राम रेडीज, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे प्रमुख भाऊ काटदरे, जलतज्ज्ञ शहानवाज शहा आदी उपस्थित होते.