रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ जागा आणि नऊ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी सरासरी ५८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. शांततेत मतदान पार पडले. मात्र, ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रियेत जिल्ह्यात ८८ ठिकाणी अडथळा निर्माण झालेला होता. यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले. सर्वाधिक ५० मशीन चिपळूण तालुक्यात बंद पडली होती. दिवसभरात जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजार ८९९ मतदारांपैकी सुमारे ५ लाख ५६ हजार १५९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १ हजार ६९३ मतदान केंद्रात प्रक्रिया पार पडली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ मतदारांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. दुपारी उन्हाचा जोर अधिक असल्यामुळे मतदानाचा ओघ थोडा कमी झालेला होता, मात्र सायंकाळी पुन्हा एकदा मतदारांनी केंद्रांवर गर्दी झालेली होती.
जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ४४४ अशा एकूण ६७० उमेदवारांचे राजकीय नशिब आज मतपेटीत बंद झाले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वच तालुक्यांतील केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत काही काळ अडथळा निर्माण झालेला होता. परंतु अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केली गेली. संगमेश्वर तालुक्यात ९ यंत्रे मतदान सुरू होण्यापूर्वी बंद पडली; तर ५ मतदान प्रक्रिया सुरू असताना बंद पडली होती. हा प्रकार सुरुवातीच्या टप्प्यात घडल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्यात आली.
त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे काही ठिकाणी मतदानाच्या टक्क्यावर परिणाम झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. तरीही, बोहल्यावर चढण्यासाठी जाणाऱ्या अनेक वर-वधूंनी नातेवाइकांसह मतदान केंद्रावर हजेरी लावलेली होती. दरम्यान, राजकीयदृष्ट्या ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध ठाकरे शिवसेना असा संघर्ष ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने कोकणच्या राजकारणात कोणत्या शिवसेनेचे वर्चस्व आहे, हे अधोरेखित होणार आहे. तसेच, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यावेळी मनसेनेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मतमोजणी सोमवारी (ता. ९) तालुकास्तरावर होणार आहे.
तालुकानिहाय मतदान – दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुकानिहाय मतदान मंडणगड-२३७४८, दापोली- ६६०४१, खेड- ६७०७६, चिपळूण- ९२६९८, गुहागर- ४८६४७, रत्नागिरी- ९९१६३, संगमेश्वर- ७२४२३, लांजा- ३३४८२, राजापूर- ५२८८१

