27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeRatnagiriउत्पादन शुल्ककडून कोटीचा मुद्देमाल जप्त - अवैध मद्याविरोध

उत्पादन शुल्ककडून कोटीचा मुद्देमाल जप्त – अवैध मद्याविरोध

अवैध दारूधंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुद्ध जोरदार कारवाई केली. यामध्ये एकूण ६६ गुन्हे दाखल करून ५१ संशयितांना अटक केली. या दाखल गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारू १ हजार ४०० लिटर, देशी मद्य ४५.९ बल्क लिटर, विदेशी मद्य ५६.७ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य ९ हजार २७४.६३ बल्क लिटर, रसायन २७ हजार २०५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या वाहनांसह एकूण १ कोटी १९ लाख १४ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झालेली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारूची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी या विभागाकडून चार पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील / बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारूधंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण- कऱ्हाड या महामार्गावरून प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.

गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुद्धची कारवाई यापुढेही सुरूच राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास उत्पादन शुल्क विभागाचा व्हॉट्सअॅप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular