महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक खळबळजनक मागणी भाजपचे आ. नितेश राणे यांनी जाहीरपणे केली आहे. ज्या मुस्लिम कुटुंबांमध्ये जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, असे विधान त्यांनी केले आहे. हिंदू समाजावर जो अन्याय होतो आहे त्याविरोधात हिंदू न्याय यात्रा मंगळवारी निघाली होती. आमच्या सिंधुदुर्गात आमच्या हिंदू समाजाने बांगलादेशात असलेल्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी मोर्चा काढला होता. बांगलादेशातले हिंदू एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला होता. महाराष्ट्रातला हिंदू समाज त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार आम्ही पाहतो आहोत, मात्र आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही हिंदूवर अत्याचार होऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही न्याय यात्रा काढली होती. असं नितेश राणे म्हणाले..
आमच्या हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत. आमच्या धर्मगुरुंना, हिंदू बांधवांना ठेचून मारलं जातं आहे. आया बहिणींवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनच्या धर्मगुरुंना अटक केली आहे. त्यांची केस घेणाऱ्या वकिलांनाही मारलं गेलं आहे. सामूहिक बलात्काराच्या घटना बांगलादेशमध्ये घडत आहेत. याविरोधात आमच्या मनात राग आहे. त्यामुळेच मी तसं बोललो. असे आ. नितेश राणे म्हणाले.
दोन पेक्षा जास्त मुलं… – मुस्लिम कुटुंबात दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतली तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये ही आमची मागणी आहे. ‘कारण मतदान करताना यांना मोदी नको असतात, हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार नको. मात्र प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ जास्त प्रमाणात घेणारी मुस्लिम कुटुंबच असतात, असा, धक्कादायक दावा देखील आ. नितेश राणे यांनी जाहीर भाषणात केला आहे. मग तुम्ही लाभ कशाला घेता? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची जी यादी आहे त्यात जास्तीत जास्त लाभार्थी मुस्लिम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे की आदिवासी समाज वगळून ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्यं असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावं असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.