गेली काही वर्षे हापूसवर होणाऱ्या फूलकिडीवर (थ्रिप्स) नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पिकावरील फूलकीड नियंत्रण पथदर्शी कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी चार गावांमधील आंबा बागांमध्ये प्रयोग केला जाणार आहे. मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन बागांमधील थ्रिप्सवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले होते, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांबरोबर झालेल्या बैठकीत फूलकिडीवरील नियंत्रणाविषयी प्रत्यक्ष बागेत जाऊन संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावे निवडण्यात आली होती. गतवर्षी काही प्रमाणात यश मिळाल्यामुळे यंदा बागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंबा टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चाही झाली.
त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील आठ गावांमधील बागांमध्ये थ्रिप्स नियंत्रणावर प्रयोग केला जाणार आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट (दापोली), गोळप, नागलेवाडी (रत्नागिरी) आणि पालशेत (गुहागर) येथील शेतकऱ्यांच्या बागा आहेत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा, देवली (मालवण), फणसे, खुडी (देवगड) या चार बागा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी विभागाकडून आवश्यक औषधे, खते किंवा लागणारे अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, तर कृषी विद्यापिठाचे संशोधक औषध फवारणीच्या वेळापत्रकासह त्यामध्ये होणारे बदल यावर लक्ष ठेवणार आहेत. पुढील आठ दिवसांमध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले. विद्यापिठाकडून कीटकशास्त्र विभागाचे संशोधक संचालक व्ही. एन. जालगावकर यांच्याकडे गेली आहे. जबाबदारी दिली प्रयोगासाठी निवडलेल्या आंबा प्रक्षेत्राला कृतीदलामार्फत भेट देण्यात आली आहे.
या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सदाशिव सदाफुले, कीटकशास्त्रज्ञ डॉ. सचिन वानखेडे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी अवेरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. नागलेवाडी येथील सदाशिव लेले यांच्या प्रक्षेत्रात प्रयोग केला जाणार असून, तेथील आंब्यांची निरीक्षणे घेण्यात आली होती. कीडींचा प्रादुर्भाव आढळल्यास कोणत्या कीटकनाशकांची फवारणी, करावी याबाबत डॉ. वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कोकणातील आंबा बागायतदारांकडून दरवर्षी फूलकिडीच्या त्रासाविषयी वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. त्यावर योग्य औषध उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यापिठाकडे केली गेली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी फूलकीड नियंत्रणासाठी विद्यापिठाकडून प्रयत्न सुरू असून, यंदा त्यात शंभर टक्के यश येईल, असा विश्वास विद्यापिठाचे संशोधक डॉ. जालगावकर यांनी व्यक्त केला आहे.
पाचवेळा केली औषध फवारणी – गतवर्षी चार बागांमध्ये फूलकीड नियंत्रणासाठी प्रत्येकी पाचवेळा औषध फवारणी करण्यात आली होती. विद्यापिठाने त्याचे वेळापत्रक तयार करून दिले होते तसेच विद्यापिठाचे संशोधक त्या बागांची पाहणी करत होते. त्यामुळे काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.