ऑनलाईन फसवणुकीच्या नवीन नवीन युक्त्या आखल्या जात असून, गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व होम स्टेमध्ये रूम बुकिंगचा फोन करत आहे. रूम बुकिंगसाठी पाठवावी लागणाऱ्या रकमेपेक्षा १० पट जादा रक्कम आपण टाकल्याचे सांगत रक्कम परत मागून फसवण्याचा अनोखा स्कॅम भामटा करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती आपण आर्मी मॅन असल्याचेही सांगत आहे. सुरुवातीला संबंधित हॉटेल, लॉज व होम स्टे धारकांच्या व्हॉटसअॅप नंबरवर काही तारखांना रूम मिळेल का, असा मेसेज टाकत आहे. त्यानंतर मोबाईलवर फोन करून रूमची माहिती घेऊन बुकिंग रक्कम कितीही असूदे तातडीने टाकतो, असे सांगून बुकिंग नक्की करतो.
काही वेळाने तो जी बुकिंग रक्कम असते त्या रकमेवर एक शून्य वाढवून तब्बल दहापट रक्कम आपण फोन पे केल्याचा स्क्रीनशॉट पाठवतो. सदर पाठवलेल्या स्क्रीनशॉटवर युपीआय आयडी, टायमिंग, संबंधित हॉटेल, होमस्टे यांचे नाव सर्व काही खर; परंतु बोगस इमेज पाठवतो व लगेचच चुकून जादा रक्कम गेली असून, बुकिंग रक्कम ठेवून उर्वरित रक्कम तातडीने मला माझ्या मोबाईल नंबरवर पाठवा, अशी मागणी करतो. यामध्ये बुकिंगसाठी २ हजार किंवा ६ हजार रुपयांऐवजी २० हजार किंवा ६० हजारांपर्यंतची रक्कम पाठवून जादा गेलेली रकमेची मागणी करत आहे; मात्र रक्कम आपल्याकडे जमा झालेली दिसून येत नाही, असे व्यावसायिकाने सांगितल्यावर बँकेतून आपल्या खात्यामधील रक्कम कट झालेला बोगस मोबाईल मेसेजही तो पाठवत आहे.
या जोडीला आपण आर्मी मॅन असून चुकून जादा रक्कम आपल्याकडे गेली असून, मला उर्वरित पैशाची तातडीने गरज असल्याचेही तो सांगत आहे. परिणामी, हॉटेल, लॉज किंवा होम स्टे मालक तातडीने पैसे परत पाठवतो आणि यातूनच रूम बुकिंग स्कॅमचा प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, यातील बहुतांश हॉटेल व लॉज, होम स्टेमालकांना या बनावट व्यक्तीची सुरू असलेली ही फसवणूक लक्षात आल्याने सावधानता बाळगली आहे.
फसवणुकीबाबत दिलासा – काही बनावट व्यक्ती रात्री आपण प्रवासात असून, या प्रवासामध्येच जादा रक्कम पाठवून आता आमच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी पैसे नसून जादा गेलेली रक्कम तातडीने माझ्या मोबाईलला पाठवा, असेही सांगत आहेत. अशामध्ये बँकांही गुगल पे, फोनपे या मागनि येणारी रक्कम सेटलमेंट करण्यासाठी तीन तासपिक्षा जास्त किंवा दुसऱ्या दिवसाचा कालावधी घेतल्याचे होणाऱ्या फसवणुकीपासून दिलासा मिळत आहे; मात्र या बोगस रूम बुकिंग स्कॅमपासून सावधान व सतर्क राहा, असे आवाहन प्रशासन करत आहे.