जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तासन्तास केसपेपर काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या आरोग्य विभागाकडून ई-सुश्रुत प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये एका क्लिकवर ई-केसपेपर काढला जातो आणि संबंधितांना टोकन दिले जाते. त्यामुळे रांगेत उभे राहून वेळ घालवण्याची कसरत थांबणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दरदिवशी अगदी ७०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येतात. जिल्हाभरातून रुग्ण येत असल्याने केसपेपर काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. कधी नंबर येईल याची खात्री नसते.
त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते तसेच वेळही जातो; परंतु आता ही गैरसोय दूर होणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाकडून ई-सुश्रुत प्रणाली सुरू करण्यात आली आहे. एका क्लिकवर रुग्णाचा ई-केसपेपर काढला जातो. त्यानंतर संबंधिताला टोकन दिले जाते. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहण्याचा रुग्णांचा त्रास वाचला आहे. दरदिवशी सुमारे ५० टक्के रुग्ण आभाकार्डसह या ई-केसपेपरचा लाभ घेत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात टोकन पद्धतीद्वारे ई-केसपेपर काढले जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयासारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये केसपेपर काढणे ही प्रक्रिया वेळकाढू असल्याने रुग्णांसाठी त्रासदायक असते. ई-केसपेपर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आभा अॅपच्या नोंदणीनंतर टोकनद्वारे ई-केसपेपर देण्यास सुरुवात झाली आहे. यावर आजारानुसार कुठल्या डॉक्टरांचे उपचार घ्यावे लागतील तेही नमूद असल्याने ई-केसपेपर मिळाल्यानंतर थेट संबंधित डॉक्टरांकडेच रुग्ण जातो. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचा वेळ व त्रास कमी झाला आहे. ई-सुश्रुत या प्रणालीत रुग्णनोंदणी, आपत्कालीन सेवा, डिस्चार्ज, बाह्यरुग्ण विभागातील सर्व सेवा, रक्तपेढी, चाचण्या, एक्स-रे आदींची नोंद या २० सेवा उपलब्ध आहेत.
मोबाईलवर मिळणार टोकन – जिल्हा रुग्णालयात ई-केसपेपरसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. मोबाइलद्वारे टोकन काढल्यावर तत्काळ ई-केसपेपर मिळू लागले आहेत, त्यामुळे रुग्णांचा वेळही वाचला आहे. सध्या ५० टक्के रुग्ण ई-सुश्रुत प्रणालीचा लाभ घेत आहेत. रुग्णाला ई-टोकन मोबाइलवर मिळते. ई-टोकन क्रमांक दिल्यावर काही क्षणातच केसपेपर मिळतो. यावर कुठल्या डॉक्टरांकडे जायचे हेही नमूद केलेले असते.