मागील काही दिवसांपासून वीज कंपनीच्या नावाने खोटे मेसेज येऊन त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अनेक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. वीज बिल भरले नसल्याचे सांगून माजगाव येथील तरुण प्रवीण साधले यांना तब्बल १ लाख ५ हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ३ तारखेला घडलेला परंतु, त्यांनी झालेल्या फसवणुकीबाबत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की माजगाव येथे साधले यांचे हॉटेल आहे. त्यांना सुरुवातीला मोबाईलवर कॉल आला. तुम्ही दोन महिन्यांचे वीज बिल भरलेले नाही, ते त्वरित भरा. अन्यथा तुमचे वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. या वेळी त्यांनी खातरजमा केली असता आपण बिल भरले आहे, असे सांगितले. परंतु, तुम्ही बिल भरले असले तरी ते आमच्या सिस्टीमला दिसत नाही. त्यामुळे ते पुन्हा भरावे लागेल, असे सांगून टीम व्हिवर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले व माहिती भरायला सांगितली.
त्यानुसार त्यांनी ते अॅप डाऊनलोड केले व एटीएमची माहिती भरली व मोबाईलवर आलेला ओटीपी समोरच्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर काही क्षणात त्यांच्या बँक खात्यातून सात वेळा ट्रान्झॅक्शन होत, एक लाख ५ हजार ७७३ रुपये कट झाले. खात्यातील मोठी रक्कम नकळत दुसरीकडे वळती झाल्याचे समजताच त्यांनी सावंतवाडी पोलिस स्टेशन व बँकेत धाव घेत माहिती दिली. हा प्रकार ऑनलाईन झाल्यामुळे या विरोधात सावंतवाडी पोलिसांनी तक्रार घेतली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.