बोगस डॉक्टरांना आळा बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) विशेष अॅप तयार केले आहे. या अॅपवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या डॉक्टरांना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. कोकणातही एमएमसीद्वारे दुर्गम भागातील डॉक्टरांची नोंदणी करण्यात येणार असून, त्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा क्यूआर कोड क्लिनिकच्या बाहेर लावणे बंधनकारक आहे. तो स्कॅन करताच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना संबंधित डॉक्टरची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे डॉक्टर नोंदणीकृत असल्याची खात्रीही करून घेता येणार आहे. बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने एक विशेष अॅप तयार केले आहे. यामध्ये परिषदेकडे नोंदणी असलेल्या सर्व डॉक्टरांची नोंद करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे राज्यभरातील १ लाख ९० हजार डॉक्टरांची नोंद आहे. या सर्व डॉक्टरांची ऑनलाईन नोंदणी विशेष अॅपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
आतापर्यंत यातील १ लाख ३४ हजार डॉक्टरांनी अॅपवर नोंदणी केली असून, उर्वरित डॉक्टरांची नोंदणीही लवकरच पूर्ण होणार आहे. यामध्ये काही नोंदणीकृत डॉक्टर हे विविध कामासाठी किंवा वैद्यकीय कामासाठी परदेशात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नोंदणी करता आलेली नाही; मात्र ते परदेशातून आल्यावर नोंदणी करू शकतात. तसेच काही डॉक्टरांचे वय झालेले असल्याने त्यांनी नोंदणी केली नसल्याने सर्वच डॉक्टरांची नोंदणी होऊ शकलेली नाही. कोकणातील सर्व जिल्ह्यात एमएमसीकडून नोंदणी करण्यात येणार आहे. या नोंदणीत दुर्गम भागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचाही समावेश करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या डॉक्टरांना एमएमसीकडून एक क्यूआर कोड देण्यात येणार असून, हा क्यूआर कोड त्यांना त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर लावणे बंधनकारक आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर डॉक्टरने घेतलेले शिक्षण, नोंदणी क्रमांक, सदस्यत्वाची अंतिम तारीख अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.