दोन महिन्यांपूर्वी लांजा तालुक्यात एका बँकेच्या कॅश डिपॉझीट मशीनमध्ये २५५०० रुपयांच्या बनावट नोटा डिपॉझीट केल्याचे उघडकीला आले होते. त्याप्रकरणी लांजातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेले दोन महिने याप्रकरणाचा तपास सुरु होता. बनावट नोटांचे मोठे रॅकेट असल्याची भीती त्यावेळी व्यक्त केली जात होती. याच दरम्यान रत्नागिरी तालुक्यातही बनावट नोटा छापल्या जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. एका छापखान्यावर कारवाई करण्यात आली होती. या दोन प्रकरणांमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
आता हे प्रकरण शांत होत असताना राजस्थानमध्ये उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणाचे लांजा कनेक्शन समोर आले आहे. कामानिमित्त लांजात वास्तव्याला असलेला राजस्थानी कारागिर आपल्या गावाकडे गेला होता. रेल्वेतून प्रवास ‘करताना तो भरतपूर रेल्वे स्थानकावर उतरला. स्टेशनवरील स्टॉलवर त्याने काही वस्तू खरेदी केल्या. त्याने दिलेल्या नोटा बनावट असल्याचा संशय स्टॉलधारकांना आला. त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याठिकाणी धाव घेत नोटा तपासल्या अंसता त्या बोगस असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
त्यावेळी त्याने आपल्या लांजात एका व्यक्तीने या नोटा दिल्याचे सांगितले. राजस्थान पोलिसांनी त्याला सोबत घेऊन महाराष्ट्र गाठला. रत्नागिरीत येऊन त्यांनी लांजा तालुक्यात जात स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघा व्यक्तींना तपासासाठी ताब्यात घेत राजस्थान येथे नेल्याचे समजते. पुन्हा एकदा बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आल्याने लांजा तालुका हादरला आहे.