रत्नागिरी शहरी भागामध्ये दिड महिन्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीच्या सेमिनारमध्ये देश-विदेशात फिरण्याचे आमिष दाखवून प्रौढाची १ लाख रुपये उकळून फसवणूक करणार्या संशयितांपैकी दोन संशयित महिलांना शहर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना १३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
त्यांच्या विरोधात डी.एस.चंद्रशेखर वय ५२, रा.शिवाजीनगर, रत्नागिरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी हसीना मोहम्मद युसूफ शेख वय २२, रा.घाटकोपर वेस्ट मुंबई आणि काजल चंद्रमणी विश्वकर्मा वय २३, रा.नागपूर अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. मे महिन्यात डी.एस.चंद्रशेखर यांनी क्रेटा गाडी खरेदी केली होती.
२६ मे रोजी त्यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. फोन करणार्याने तुम्ही क्रेटा गाडी खरेदी केल्यामुळे लकी कपल निवडण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही २८ मे २०२२ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वा. भाटये येथील कोहिनुर बीच रिसॉर्ट येथे व्हॉस्कॉन रिअल इस्टेट अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमार्फत सेमिनारमध्ये या असे सांगण्यात आले.
चंद्रशेखर त्या ठिकाणी गेले असता संशयितांनी त्यांना क्लब मेंबरशीपबाबत माहिती दिली. मेंबरशिप अंतर्गत देशात व परदेशात पर्यटनासाठी जाउ शकतो असे सांगून विशेष स्कीम अंतर्गत माहिती देउन परदेशी पर्यटनासाठी स्कीम मेंबरशीपची फी १० वर्षांसाठी १ लाख ९० हजार व देशांतर्गत पर्यटनासाठी १ लाख भरायला लागतील असे सांगितले.
तेव्हा त्यासाठी डी.एस चंद्रशेखर तयार होउन त्यांनी क्रेडिट कार्ड व डेबीट कार्डव्दारे ९० हजार रुपयांचे पेमेंट केले. परंतु,काही दिवसांनी मेम्बरशिपचा फायदा घेण्यासाठी चंद्रशेखर यांनी कंपनीच्या हेल्पलाईन आणि मोबाईल नंबरवर संपर्क केला असता त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या कंपनीच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.